Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी सहाय्यक परीक्षेत गैरप्रकार?
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी सहाय्यक परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरियांचं सरकारला पत्र. विद्यापीठाच्या भूमिकेवर संशय
अकोला : मोठ्या प्रतिक्षेनंतर झालेली अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी सहायक पदासाठीची परीक्षा वादात सापडली आहे. 10 एप्रिलला 51 पदांसाठीची ही परीक्षा पार पडली होती. या परीक्षेत जवळपास साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. मात्र, या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप राज्यभरातील परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. सोबतच या परीक्षेत मोठे गैरप्रकार झाल्याचा आरोप कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार विप्लव बाजोरिया, मोरेश्वर वानखडे आणि विठ्ठल सरप यांनी केला आहे. या तिघांनीही यासंदर्भातील तक्रार राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आमदार विप्लव बाजोरिया आणि विठ्ठल सरप हे दोन्ही सदस्य कृषी खातं असलेल्या शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या दोन जबाबदार नेत्यांच्या आरोपानंतर या परीक्षोबाबत कृषीमंत्री दादा भुसे काय निर्णय घेतात, याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे हे आहेत आरोप
कार्यकारी परिषदेच्या तिन्ही सदस्यांना राज्याच्या कृषी सचिवांना लिहिलेल्या पत्रात या परीक्षेसंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. पत्रात परीक्षा केंद्रावर कोणतीच सुरक्षा नव्हती, परीक्षा केंद्रात 'मास कॉपी' झाली, अनेक परीक्षार्थींनी कोरे पेपर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पत्रातील आरोपांचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
1) प्रश्नपत्रिका संच 'ए', 'बी', 'सी', 'डी' या पद्धतीने न देता एकच सामाईक प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना देण्यात आली. त्यामुळे परीक्षा केंद्रात विद्यार्थी एकमेकांना विचारुन प्रश्नांची उत्तर लिहित होती. यातून परीक्षा केंद्रावर 'मास कॉपी'चा प्रकार घडला.
2) परीक्षा केंद्रावर कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने कुठलेच धरबंद नव्हते.
3) परीक्षेमध्ये ज्या क्रमाने परीक्षा फॉर्म भरण्यात आले, त्याच क्रमाने बैठक क्रमांक मिळाले. यात जाणीवपूर्वक फॉर्म भरुन काही विद्यार्थी त्यांच्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी बसवले गेले.
4) परीक्षेचा पेपर द्विवार्षिक अभ्यासक्रमावर आधारित हवा असताना 90 टक्के प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरचे देण्यात आले.
5) काही परीक्षार्थींनी कोरे पेपर दिल्याने त्यांची चौकशी केली जावी. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परत न दिल्याने विद्यापीठाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संशयाचं वातावरण.
6) पेपर परीक्षा सुरु होण्याच्या 20 मिनिटांपूर्वीच देण्यात आल्याचा दावा.
परीक्षा रद्द करण्यात आली नाही तर विद्यापीठासमोर आत्मदहन : अन्यायग्रस्त परीक्षार्थी
या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ही परीक्षा तात्काळ रद्द करण्याची मागणी राज्यभरातील अनेक परीक्षार्थींनी केली आहे. या परीक्षेचा निकाल लागला असून निकाल लागलेल्या यादीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी या परीक्षार्थींनी केली आहे. ही परीक्षा रद्द न झाल्यास विद्यापीठासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा यातील परीक्षार्थी संदीप भावले, सोपान बाचकर, राहुल चौधरी, हनुमंत सानप, अभिषेक काळे, पवन भुसारे, चेतन राजपूत, संदीप गायकवाड, मुस्तकीन मोमीन, चेतन पाटील, शुभम थोरात आणि विपुल वुमले यांनी दिला आहे.
दरम्यान, कार्यकारी परिषदेवर नामनियुक्त सदस्य असेलेले विठ्ठल सरप यांनी हा प्रश्न तडीस नेणार असल्याचं म्हटलं आहे. यात समोर आलेले प्रकार गंभीर असून हा गैरव्यवहार सरकार दरबारी मांडणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार विद्यापीठाकडून होत असल्याचा आरोप सरप यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केला आहे.
विद्यापीठाने फेटाळले सर्व आरोप
या सर्व आरोप आणि गोंधळावर 'एबीपी माझा'ने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवल्याचं म्हटलं आहे. शिवाय सर्व पेपर तपासणी 'इन कॅमेरा' झाल्याचं सांगितलं आहे. पेपर तपासणीत एकही उत्तरपत्रिका कोरी आढळली नसल्याचं ते म्हणाले. यात होत असलेल्या आरोपांत कोणतंही तथ्य नसल्याचं डॉ. काळबांडे यांनी स्पष्ट केलं आहे.
याआधी ही परीक्षा तीन वेळा पुढे ढकलली
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने नोव्हेंबर 2019 मध्ये कृषी सहाय्यकांच्या पदांसाठी जाहिरात काढली होती. यासाठी मार्च 2020 मध्ये ही परीक्षा होणार होती. मात्र, त्यानंतर उद्भवलेल्या कोरोना परिस्थितीमुळे ही परीक्षा पहिल्यांदा पुढे ढकलावी लागली. त्यानंतर आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या घोळाच्या काळात आसपासच्या तारखांमुळे सप्टेंबर 2021 मध्ये ही परीक्षा पुढे ढकलली होती. 14 नोव्हेंबर 2021 रोजी ही परीक्षा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढे ढकलण्याची नामुष्की सरकार आणि विद्यापीठावर आली होती.
एवढे विघ्न आल्यानंतरही या परीक्षेवरचे अनिश्चिततेचे काळे ढग अद्याप दूर झालेले नाहीत. परीक्षा घेण्यावरचे गंभीर आरोप, आपल्याच पक्षाच्या लोकांनी यात सरकारला दाखवलेला आरसा, विद्यार्थ्यांच्या आत्मदहनाचा इशारा आणि आरोप होत असताना विद्यापीठानं साधलेलं मौन यावर सरकार काय निर्णय घेतं याकडे या परीक्षेशी संबंधित राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.