मोठी बातमी : UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय, तहसीलदार, गटविकास ते उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
Akola News : 'यूपीएससी'नंतर आता 'एमपीएससी'च्या पदांमधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
Akola News अकोला : यूपीएससीत निवड झालेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन वादंग उठला आहे. त्यानंतर आता इकडे MPSC च्या पदभरतीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता आहे. 'यूपीएससी' (UPSC) नंतर आता 'एमपीएससी'च्या (MPSC) पदांमधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका आहे. त्यामुळे 9 जण जे असे प्रमाणपत्र दाखवून अधिकारी झाले आहेत, ते रडारवर आहेत. या नऊ जणांची आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे.
10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात
2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या 10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीला दिले आहेत. या सर्व उमेदवारांच्या आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचण्या होण्याची शक्यता आहे. एकूण 623 पदांसाठी परीक्षा झाली होती. यातील 10 जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार दखल
दिव्यांग कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या बुलढाणा येथील एका उमेदवाराचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या या उमेदवाराने याआधी खेळाडू, अंध आणि इतर कोट्यांचा फायदा घेतला होता. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेत, त्यांची तक्रार 'महाराष्ट्र लोकसेवा आयोगा'चे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात तक्रार करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या कानावरही हा प्रकार घातला आहे. आमदार मिटकरींनी यासंदर्भात सरकार आणि प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात चर्चा करीत कारवाईची मागणी केलीये.
पूजा खेडकरांचे कारनामे, 'माझा' कडून पोलखोल
- 9 जुलै - पूजा खेडकरांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर.
- 10 जुलै - पूजा खेडकरांनी दिव्यांगांच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर.
- 11 जुलै - ओबीसी कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर आलं.
- 12 जुलै - पूजाची आई मनोरमा खेडकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर.
- 13 जुलै - पूजा खेडकरांनी लाल दिवा वापरताना नियमांचा भंग केल्याचं स्पष्ट, पोलिसांकडून कारवाई सुरू.
- 14 जुलै - पूजा खेडकरांनी वापरलेली ऑडी कार पोलिसांकडून जप्त, पूजा खेडकरांचे आई-वडील गायब असल्याचं स्पष्ट.
- 15 जुलै - एमबीबीएस करताना पूजा खेडकरांचं काशीबाई नवले महाविद्यालयात वेगळं नाव असल्याचं समोर.
- 15 जुलै - वडील क्लास वन अधिकारी असतानाही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देऊन एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचं समोर.
इतर महत्वाच्या बातम्या