अजित पवार हेही पायी वारीत, 'या' मार्गावर चालणार; विधानसभेतून घोषणा, काकांना टोला
वारकऱ्यांना वर्षभरापासून ओढ लागलेल्या विठ्ठल भेटीची तारीख आता जवळ आली आहे. आषाढ महिना सुरु होताच, वारीत चालणाऱ्या दिंड्या पंढरीकडे येतानाचे चित्र दिसून येते
मुंबई : पाऊले चालती पंढरीची वाट... माऊली.. माऊली... म्हणत लाखो वारकरी पंढरीच्यादिशेने निघाले आहेत. ऊन, पाऊस, वारा कशाचीही तमा न बाळगता विठ्ठल नामाचा जप करत वारीत पाऊले चालत आहेत. यंदा प्रथमच वारीत सहभागी होणाऱ्य दिंडींना राज्य सरकारकडून प्रती दिंडी 20 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. तर, राजकीय नेत्यांचा वारीतील सहभागही यंदा चर्चेचा विषय बनला आहे. शरद पवार (Sharad Pawar) स्वत: पायी वारीत सहभागी होणार आहेत, तर राहुल गांधींनाही वारीतील (Pandharpur wari) सहभागाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. आता, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी पायी वारीत सहभागी होणार असल्याचं म्हटलं. अधिवेशन काळात विधानसभेत बोलताना अजित पवारांनी वारीचं महत्त्व आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच, आपण वारीत सहभागी होणार असल्याचंही जाहीर केलं.
वारकऱ्यांना वर्षभरापासून ओढ लागलेल्या विठ्ठल भेटीची तारीख आता जवळ आली आहे. आषाढ महिना सुरु होताच, वारीत चालणाऱ्या दिंड्या पंढरीकडे येतानाचे चित्र दिसून येते. यंदा 17 जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशी असून सर्वत्र उत्साह दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकांच्या अगोदरची ही पंढरीचा वारी असल्याने यंदा राजकीय नेत्यांचीही वारी पंढरीत दिसून येत आहे. शरद पवार, राहुल गांधी यांच्यानंतर आता अजित पवार हेही पायी वारीत सहभागी होणार आहेत. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनीच याबाबत माहिती दिली.
''वारकऱ्यांना दिंडीतून जाताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे, वारकरी संप्रदाय महामंडळ आणि वारीतील प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपये देण्याची संकल्पना सरकारने मांडली आहे. मी अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी येथील पालखी सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन घेतले. त्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्यात वारी उत्सवात सहभाग घेतला. मात्र, मला काही अद्याप जाता आलं नाही, पण उद्या पालखी बारामतीत मुक्कामाला येत आहे. परवा मी, सकाळपासून काटेवाडीपर्यंत वारीत चालत जाणार असल्याची'' घोषणाच अजित पवारांनी विधानसभेत वारीसंदर्भात बोलताना केली.
शरद पवारांना टोला, जयंतरावांना निमंत्रण
आता, सगळ्यांनाच वारीच्या पालखीत चालत जावसं वाटतंय, मग आपणही सहभागी होऊया, असे म्हणत नाव न घेता गालावर स्मीतहास्य करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावल्याचं दिसून आलं. तसेच, जयंतराव येथील का नाही कुणास ठाऊक, पण मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणात तिथं घेऊन जायला तयार आहे, असे म्हणत अजित पवारांनी जयंत पाटील यांनाही हसत हसत आवाहन केलं.
पंढरीच्या वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे
वारीला जागतिक नामांकन मिळालं पाहिजे, त्यामुळे युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मला दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या लक्षात आणून द्यायचं आहे, पण वारीला येणाऱ्या वारकऱ्यांप्रती एवढं प्रेम, आपुलकी, जिव्हाळा दाखवण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील याच सरकारने केलं आहे, असेही अजित पवारांनी म्हटले.
राहुल गांधी 14 जुलै रोजी वारीत?
महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी सोहळ्यासाठी लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरपुरात येऊन विठुरायाचे दर्शन घेणार आहेत . याबाबत काँग्रेसच्या एका जेष्ठ नेत्याने यास दुजोरा दिला असून 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असल्याने त्यापूर्वी 13 किंवा 14 जुलै रोजी राहुल गांधी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत .
शरद पवार हेही वारीत सहभागी होणार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत.