Ajit Pawar : तिकडे शरद पवार कोल्हापुरात, इकडे अजित पवारांची मोठी घोषणा; आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडिअम उभारणार
Kolhapur Cricket Stadium : कोल्हापूर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी एमआयडीसीकडील 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करावी असे निर्देश अजित पवारांनी दिले आहेत.
मुंबई : कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या 421 हेक्टर जागेपैकी 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. या जागेवर स्टेडिअम उभारण्यासाठी लागणारा खर्च कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन करणार असून क्रीडा विभागाने त्यांच्याशी करार करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला क्रीडांगण उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समिती कक्षात बैठक घेतली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार तथा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे शहरी भागासह ग्रामीण परिसरात देखील क्रीडा क्षेत्राला वलय प्राप्त होऊ लागले आहे. राज्यासह देश पातळीवर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ग्रामीण भागात दिवसेंदिवस क्रिकेट खेळाची लोकप्रियता वाढू लागली आहे. क्रिकेट खेळाडूंच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. पुढील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये क्रिकेट खेळाचा समावेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात क्रिकेट खेळाच्या विकासासाठी आणि सर्वोत्तम खेळाडू निर्माण होण्यासाठी दर्जेदार क्रीडांगणांची आवश्यकता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम झाल्यास कोल्हापूरसह सांगली, सातारा परिसरातील क्रिकेट खेळाडूंना याचा लाभ होणार आहे. यासाठी विकासवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक 110 व 111 मधील 12 हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यात यावी. या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी क्रीडा विभाग आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाने विकासवाडी येथे त्यांच्या ताब्यात असलेल्या गट क्रमांक 110 व 111 मधील 12 हेक्टर जागेसंदर्भातील डी-नोटिफिकेशन त्वरित काढावे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालय व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठी या जागेबाबतचा अहवाल तातडीने संबंधित विभागांकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली.