(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : मराठवाड्यासह विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अधिवेशन तीन आठवडे घ्यावं, अजित पवारांची मागणी
Assembly Winter Session : येत्या 19 डिसेंबरपासून नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी तीन आठवडे करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
Ajit Pawar : मराठवाडा आणि विदर्भातील ( Marathwada and Vidarbha) प्रश्नांना न्याय देण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) किमान तीन आठवडे घ्यावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीची विधान भवनात आज बैठक झाली. या बैठकीत अजित पवार बोलत होते. तसेच मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृतमहोत्सव सर्वपक्षीयांच्या सहभागातून भव्य प्रमाणात साजरा करावा अशी मागणी देखील अजित पवारांनी या बैठकीत यावेळी केली.
नागपूर अधिवेशन (Assembly Winter Session) किती दिवस याचा निर्णय पुढच्या बैठकीत
कोरोनाच्या संकटामुळं (corona Crisis) दोन वर्षे नागपूरला हिवाळी अधिवेशन होऊ शकले नाही. त्यामुळं विदर्भाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी, विदर्भवासियांमधील दुर्लक्षाची भावना दूर करण्यासाठी नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. विरोधी पक्षनेत्यांची मागणी विचारात घेऊन अधिवेशनच्या काळात नागपूर येथील पुढील बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याचे विधानसभा अध्यक्ष डॉ. राहूल नार्वेकर (Rahul Narwekar) तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मान्य केले आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी नेमक्या काय केल्या मागण्या
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरं व्हावं, अशी महाराष्ट्रातील नागरिकांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती असे अजित पवार म्ङणाले. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचं अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करण्यात यावं, मराठववाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा असेही अजित पवार यावेळी म्हणाले. विधीमंडळ सदस्यांना सभागृहाच्या कामकाजात अधिकाधिक भाग घेता यावा, यासाठी सभागृहाचे कामकाज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरु व्हावं अशा मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या आहेत. आता मागण्यांवर विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
19 डिसेंबरपासून सुरु होणार हिवाळी अधिवेशन
येत्या 19 डिसेंबरपासून नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी हा 10 दिवसांचा असणार आहे. 19 ते 29 डिसेंबरपर्यंत विधीमंडळाचं कामकाज चालणार आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या: