(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Agriculture News : कांदा कोणीही खरेदी केल्यास अडचण नाही, फक्त शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा; BRS च्या कांदा खरेदीवर भुजबळांची प्रतिक्रिया
Agriculture News : तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील कांद्याची खरेदी करण्याची दर्शवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
Agriculture News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा स्थितीत तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील कांद्याची खरेदी करण्याची दर्शवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कांदा खरेदीमुळं जर मुख्यमंत्री झाले असते तर सगळेच पक्ष महाराष्ट्रात येवून लासलगावमध्ये येवून बसले असते असं वक्तव्य भुजबळांनी केलंआहे. तर कांदा कोणीही खरेदी केल्यास अडचण नाही. फक्त शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा असेही भुजबळ म्हणाले.
नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदीकडे BRS पक्षाचं लक्ष
माझ्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळत असेल तर कोणीही कांदा खरेदी केल्यास कोणाचीही हरकत राहण्याचे कारण नाही. आपला कांदा हा असाही इतर राज्यात देशात विकला जातोच आहे. त्यात आपले काहीही दुर्भाग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार छगन भुजबळ यांनी येवल्यात दिली. तेलंगणा राज्यातील ' बीआरएस ' पक्ष हा महाराष्ट्रात आपले पाय रोवू पाहत आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदीकडे या पक्षानं आपलं लक्ष वळवले आहे.
कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी संकटात
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव इथं कांद्याचे लिलाव झाल्यानंतर देशभरात कांद्याचे दर ठरतात. महाराष्ट्रातील कांदा हैदराबाद, तेलंगणा याठिकाणी विक्री केला जात आहे. मात्र, सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळं तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रातील विस्तारासाठी रणनीती आखली असून अबकी बार किसान सरकार हा नारा दिला असून, राज्यातील कांदा खरेदी करण्याकडं लक्ष वळवले आहे.
बदलत्या वातावरणाचा कांद्याला फटका
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. या बदलत्या वातावरणाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. सध्या कांद्याला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवून ठेवला आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळं हा कांदा सडू लागला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकच्या कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी कांद्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. मात्र, कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय.
महत्त्वाच्या बातम्या: