बळीराजासाठी 'स्वाभिमानी'कडून आंदोलनाची हाक; राज्यभरात कुठे चक्काजाम, तर कुठं रास्तारोको
Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : बळीराजासाठी 'स्वाभिमानी'कडून आंदोलनाची हाक. राज्यभरातून बळीराजाची साद, कुठे चक्काजाम, तर कुठं रास्तारोको.
Swabhimani Shetkari Sanghatana Agitation : राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जाव लागतंय. दरम्यान शेतीला दिवसा वीज मिळावी आणि वीज तोडणी थांबवावी, या मागण्यांसाठी राज्यात आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. आज म्हणजेच, 4 मार्चपासून संपूर्ण राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) चक्काजाम आंदोलन करत आहे. तसंच नेत्यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊ देणार नसल्याचा इशाराही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी दिला आहे.
एकीकडे राज्यभरात शेतीला दिवसा वीज मिळत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा 10 तास वीज पुरवठा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. 12 वीची परीक्षा असल्याने शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सकाळी 11 नंतरच रास्ता रोको करावा. अशी विनंती राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच जे विद्यार्थी आणि पालक या रास्ता रोकोमध्ये अडकले असतील तर त्यांना परिक्षा केंद्रापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करावी, असंही ते म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : राज्यात लोडशेडींगचं संकट, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
स्वाभिमानीचं आंदोलन नेमकं कशासाठी?
शेतीला दिवसा वीज मिळावी या मुख्य मागणीसाठी मागील काही दिवसांपासून कोल्हापूरच्या महावितरणच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. शेतीला दिवसा दहा तास वीज देण्याचा निर्णय झाला नाही, तर 4 मार्चपासून आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला होता. यापूर्वी दोन मंत्री, दोन आमदारांनी आंदोलनाला भेट दिली होती. मात्र, शासनस्तरावर कोणताही निर्णय झाला नाही. यापुढे मंत्री, आमदारांच्या सार्वजनिक कार्यक्रमात अडथळा आणणार, असाही इशाराही राजू शेट्टी यांनी यापूर्वी दिला होता. ऊर्जामंत्र्यांनी आंदोलनातील नुकसानीची जबाबदारी माझ्यावर टाकून बघावी, विजेच्या वाढीव दरांची जबाबदारी त्यांच्यावर टाकेन, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला होता.
आंदोलनाची हाक, राज्यभरातून साद
राजू शेट्टींच्या या आवाहनामुळे बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी मध्यरात्रीपासून जळगाव संग्रामपूर महामार्ग रोखून धरला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी मार्गावर टायर जाळून मार्ग अडविला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान आजपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. त्यातच स्वाभीमानीनं पुकारलेल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सोलापुरात बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :