Ashadhi wari 2023 : काय सांगता! पालखी सोहळ्यानंतर देहूत 14 टन ओला कचरा अन् 650 किलो प्लास्टिक केला गोळा
पालखी सोहळ्यानंतर देहू गावातून 4 टन ओला कचरा आणि इतर कचरा, तसेच 650 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.
Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान काल देहूतून झालं. या पालखी सोहळ्यादरम्यान झालेल्या कचऱ्याची स्वच्छता त्वरीत करण्यात आली आहे. गावात स्वच्छता राहावी आणि कोणालाही यापासून दुर्गंधी किंवा त्रास होऊ नये, यासाठी लगेच स्वच्छता करण्यात आली. 14 टन ओला कचरा आणि इतर कचरा, तसेच 650 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला
देहू परिसराची झाडलोट आणि स्वच्छता करून कचरा संकलित करण्यात आला आणि कचऱ्याचे उचित व्यवस्थापन करण्यात आले. अन्नपदार्थ, पत्रावळी अशा स्वरुपाचा 14 टन ओला कचरा व इतर कचरा, तसेच 650 किलो प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला आहे. जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळा पंढरीकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहू नगरीतील रस्त्यांची त्वरीत स्वच्छता करण्यात आली.
पालखी सोहळ्यादरम्यान पालखी मुक्काम विसावा निवारा आणि रस्त्याच्याकडील कचरा तसेच परिसरातील स्वच्छता करून गाव स्वच्छ सुंदर आणि निर्मल ठेवण्यात येणार आहे. याकरिता जिल्हा परिषद पुणे मार्फत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर प्रत्येकी 200 कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा पुढे गेल्यावर स्वचछता करण्यासाठी 250 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी मुक्काम, विसावा, निवारा व रस्त्याच्या कडेलाही स्वच्छतेसाठी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामच्या एक दिवस अगोदर कचराकुंडी उभारण्यात येणार असून पालखी प्रस्थान झाल्यानंतर तात्काळ परिसरातील झाडलोट करून घनकचरा प्रकल्प केंद्र ठिकाणी प्रक्रियेसाठी दिला जाणार आहे
'संविधान दिंडी'चं आयोजन...
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर 'संविधान दिंडी' चे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक न्याय आणमि विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मुख्य संकल्पनेतून आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली या 'संविधान दिंडी' चे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे रथाच्या माध्यमातून भाविकांमध्ये संविधानाची जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येणार आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे.