(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा आरक्षण : राज्यभरात जल्लोषासोबतच आत्मबलिदान देणाऱ्यांना श्रद्धांजली
मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत आनंद साजरा केला. तर राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्मबलिदान दिले त्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबई : 'आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन प्रत्यक्षात आलं आहे. विरोधकांनी मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने पाठिंबा दिल्याने, कोणत्याही चर्चेशिवाय मराठा आरक्षण विधेयक विधीमंडळात मंजूर झालं आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा आनंद राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांसह मराठा समाज साजरा करत आहे. मराठा समाजाला आरक्षणाची घोषणा होताच मुंबईमध्ये भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात नाचत आनंद साजरा केला. तर राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्मबलिदान दिले त्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बारामती : मराठा आरक्षण जाहिर होताच सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे. बारामती शहरातील भिगवण चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत भाजप सरकार झिंदाबादच्या घोषणा देत मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल फटाके फोडत व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला.
जालना : मराठा आरक्षण विधयेक विधिमंडळात एकमताने मंजूर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. मात्र जालना येथे सकल मराठा समाजाने या जल्लोषाचा निषेध केला. याशिवाय या आरक्षण आंदोलनात मृत्यू पावलेल्या आंदोलकांना यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. हक्काचं आरक्षण असताना सत्ताधाऱ्यांची भूमिका भीक दिल्यासारखी असून याचा आम्ही जल्लोष करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत आंदोलकांनी सभागृत मंजूर झालेल्या विधयेकाचे स्वागत केले आहे. दरम्यान हे आरक्षण न्यायालयात टिकेल अशी अपेक्षा या आंदोलकांनी व्यक्त केली. सांगली : मराठा आरक्षण मिळाल्याचा सांगलीत भाजपाकडून जल्लोष साजरा करण्यात आला. शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आतिषबाजी व साखर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने मात्र जल्लोष न करता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मराठा आरक्षणासाठी ज्या मराठा समाज बांधवांनी बलिदान दिले, त्या 40 समाज बांधवांना श्रद्धांजली वाहून सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. ठाणे : मराठा समाजाला आरक्षण जाहिर होताच ठिकठिकाणी मिठाई वाटप व फटाके फोडून आनंद व्यक्त होत असतानाच ठाणे मराठा क्रांती मूकमोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी ज्या तरुणांनी आत्मबलिदान दिले त्या तरुणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही आमच्या दुःखातून सुख शोधत असल्याची प्रतिक्रिया दिली. आज आरक्षण देण्याचे जाहिर झाले असले तरी ज्या तरुणांना आंदोलनात आपले प्राण गमवावे लागले त्यांना विसरून चालणार नाही. यासाठी कुठलाही जल्लोष, फटाक्यांची आतिषबाजी मिठाई वाटप न करता आम्ही श्रद्धांजली वाहून आम्ही दुःखात आमचं सुख शोधत असल्याचे सांगत जाहीर केलेल्या आरक्षणात कोणीही खोडा न घालता दिलेलं आरक्षण कोर्टात टिकावं, अशी प्रतिक्रिया ठाणे मराठा क्रांती मूक मोर्चाच्या समन्वयकांनी दिली. अहमदनगर : सरकारच्या वतीने मराठा समाजास 16 टक्के आरक्षण जाहिर झाल्यानंतर राज्यभरात भाजपकडून जल्लोष केला जात आहे. अहमदनगर शहरासह जामखेड तालुक्यात देखील भाजपच्या वतीने घोषणाबाजी करत शहरातून ढोल वाजवत मिरवणूक काढण्यात आली. एवढेच नाही तर पेढे भरवून जल्लोषही करण्यात आला. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला सादर केल्यानंतर आज विधीमंडळात मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण जाहिर करण्यात आलं. जामखेड येथील सत्ताधारी भाजपा पक्षाच्या वतीने घोषणाबाजी करत मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला. कोल्हापूर : मराठा समाजासाठी राज्य सरकारने 16 टक्के आरक्षण जाहिर केल्यानंतर कोल्हापुरात मराठा समाजातील कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.