Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणी गृहमंत्र्यांनी पोलीसांकडून घेतली माहिती, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरापर्यंत चर्चा
Abhishek Ghosalkar Firing : आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय.
Abhishek Ghosalkar Firing : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली. ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात मोठी अपडेट समोर येतेय. अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणाची माहिती गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांकडून घेतल्याचं सूत्रांकडून समजत आहे.
गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतली - सूत्र
आठवड्याभरात दुसरे गोळीबार प्रकरण समोर आल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनाला पडावा इतक्या भयंकर घटना सध्या या राज्यात घडतायत. या प्रकरणाची माहिती गृहमंत्र्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्याचं सुत्रांकडून समजतंय. तर नेमकं प्रकरण कोणत्या वादातून घडलं याची माहिती देखील गृहमंत्र्यांनी घेतल्याचं समोर येतंय. गुरूवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणी चर्चा केल्याची माहिती समजत आहे, तर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या प्रकरणानंतर विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय.
दोन्ही घटना ताज्या असतानाच..
आधी कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची आधी पुण्यात त्याच्याच साथीदारांनी दिवसाढवळ्या, भर रस्त्यात हत्या केली. मग कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्थानकातच शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, मुंबईतल्या दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडून त्यांची गुरूवारी हत्या करण्यात आली.
अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा कोण आहे?
ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं. अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा मॉरिस नावाचा इसम दहिसर- बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती आहे. स्थानिक राजकीय वर्तृळात मॉरिस नावाच्या व्यक्तीला स्वयंघोषित नेता म्हणून ओळखले जायचे. गणपत पाटील नगरमध्ये मॉरिस काम करत होता.
पैश्याच्या वादातून हल्ला झाल्याची माहिती समोर
बोरिवलीतील पश्चिममधील प्रभू उद्योग भवन कार्यालयात अभिषेक यांच्यावर गोळीबार करण्यात आला. पैश्याचा वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकरांचे पुत्र आहेत. मॉरिस नोरोन्हा नावाच्या व्यक्तिकडून अभिषेक घोसाळकरांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकरांच्या शरीरात घुसल्या होत्या.