Aaditya Thackeray : हुकुमशाही जेव्हा संपायला येते, तेव्हा असा वापर केला जातो, सूरज चव्हाणांवरील कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा घणाघात
Aaditya Thackeray : सूरज चव्हाण यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आलीये.
मुंबई : 'जे देशभक्त आहेत, त्यांना अटक केली जाते. ईडी, आयकर विभाग, सीबीआय हे त्यांचे मित्र आहेत. हुकुमशाही जेव्हा संपायला येते, तेव्हा असा वापर केला जातो', असं म्हणत सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) प्रतिक्रिया दिली. कथित कोविड खिचडी घोटाळ्यामध्ये आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडीची (ED) कोठडी सुनावण्यात आलीये. दरम्यान त्यांना बुधवार 17 जानेवारी रोजी ईडीकडून अटक करण्यात आली होती.
दरम्यान ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांच्या घरावर देखील एसीबीचं धाडसत्र सुरु आहे. यावर देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीये. राजन साळवी आहेत, वायकर आहेत, हे असंच सुरु आहे. देशासाठी काम करणाऱ्यांना हैराण केलं जातं. आज आम्हाला त्रास दिला जातोय, उद्या तुम्हाला दिला जाईल, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.
वेळ आली की सगळं सांगतो - आदित्य ठाकरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दावोसच्या दौऱ्यावर आहेत. यावर पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला. आणखी काही जणांना नेलं आहे. आमच्याकडे त्याचे फोटो आलेत. वेळ आली की सगळं समोर आणतो. आता त्यांना मज्जा करु द्या, तिकडे हवा थंड आहे, इकडे आले की आम्ही हवा गरम करु, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.
सूरज चव्हाण यांच्यावर ईडीवर कारवाई
आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकणी 22 जानेवरीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आलीये. तसेच 22 जानेवारीपर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत. ईडीने सूरज चव्हाण यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. दरम्यान 17 जानेवारी रोजी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणांवर कारवाई करण्यात आलीये.
राजन साळवी यांची चौकशी
ऑक्टोबर 2009 ते २ डिसेंबर 2022 पर्यंत 14 वर्षात बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवींवर ठेवण्यात आला आहे. साळवी यांच्याकडे 3 कोटी 53 लाख इतकी या बेहिशेबी मालमत्तेची रक्कम सापडल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साळवी यांची मूळ संपत्ती अंदाजे 2 कोटी 92 लाख रुपये इतकी आहे. बेहिशेबी मालमत्तेचा आकडा हा 118 टक्के इतका जास्त असल्याचा आरोप आहे.