Gondia News : जिल्हा परिषदेच्या शाळेत अजब कारभार; 7 वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पालकांचा संताप
Gondia News : गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अजब कारभार समोर आला आहे. या शाळेत 7 वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक असल्याचे समोर आले आहे.
Gondia News गोंदिया : विदर्भातील जवळ जवळ सर्व शाळांना 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांनी शाळेची सुरुवात स्मरणीय ठरलीय. काही शाळांनी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे फुलं देऊन स्वागत केले. तर काही शाळांनी पहिल्याच दिवशी शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगळे कार्यक्रम ठेवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मात्र, गोंदिया जिल्ह्याच्या (Gondia News) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बंध्या या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत (ZP school Gondia) अजब कारभार समोर आला आहे. या शाळेत 7 वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक (Teacher) असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत विद्यार्थांना शाळेत पाठवणार नाही. असा निर्णय विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतलाय.
7 वर्गासाठी फक्त दोनच शिक्षक, पालकांचा संताप
राज्यात 1 जुलै 2024 पासुन विदर्भातील संपूर्ण शाळा सुरु झाल्यात आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा करण्यात आला. मात्र, वडेगाव येथील शाळेत केवळ दोनच शिक्षक असुन विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत एकुन 1 ते 7 वर्ग असुन एकूण 112 विद्यार्थी या शाळेत आहेत. मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एकच शिक्षक असुन या शाळेला एकूण 5 शिक्षकांची गरज असताना शाळेला दोनच शिक्षक आहेत. तर अद्याप इतर 3 पदे रिक्त आहेत. विद्यार्थांच्या पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने शासनाप्रति तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने सर्व शाळेला शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा लावून होते. परंतु जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक शाळेला दिला नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पासून सगळ्यांना निवेदन दिले.
विद्यार्थांविना शाळा ओस, पालकांमध्ये तीव्र रोष
परंतु गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेत शिक्षकांची अजुनही नियुक्ति केली नाही. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करत कालपासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. त्यामुळे विद्यार्थांविना शाळा ओस पडली आहे. जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्यांची पीकविमा कंपनीकडून थट्टा; हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर अगदी तुटपूंजी रक्कम
-
शालेय पोषण आहार बनवणाऱ्या व्यक्तीनं केलं चिमुकलीसोबत असं काही कृत्य, घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला