Nylon Manja : नागपुरात नायलॉन मांजामुळे कापला 5 वर्षीय चिमुकलीचा गळा, 26 टाकेही पडले
एकाच्या हाती मांजा लागल्याने त्याने तो ओढण्यास सुरुवात केली. गळ्याला घासून गेल्याने पिडीतेच्या गळ्याला खोलवर जखम झाली. रक्तबंबाळ झालेल्या चिमुकीला आजूबाजूच्या लोकांनी लगेच रुग्णालयात दाखल केले.
Nagpur News : नायलॉन मांजा वापर, विक्री, साठा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरी छुप्या मार्गाने याची विक्री जोरात सुरु असून याचा फटका घराशेजारी खेळणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीला बसला आहे. गळ्यावर मांजा घासल्याने तिचा गळा कापला गेला असून तिला तत्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले.
नागपुरातील फारुख नगरमधील पाच वर्षीय शबनाज बेगम शाळेतून घरी आली आणि त्यानंतर ती घराशेजारी खेळत होती. बाजूच्या दुसऱ्या इमारतीवर मुले पतंग उडवत होते. दरम्यान एक पतंग कटली. त्या पतंगाचा मांजा पकडण्यसाठी परिसरातील मुलांनी धडपड सुरु केली. एका मुलाच्या हाती मांजा लागल्यानंतर त्याने, तो मांजा ओढण्यास सुरुवात केली. दरम्यान मांजा पीडितेच्या गळ्याला घासून गेल्याने तिच्या गळ्याला खोलवर जखम झाली. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या चिमुकीला आजूबाजूच्या लोकांनी लगेच रुग्णालयात दाखल केले. यात मुलीच्या मानेला 26 टाके घालावे लागले असून तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेनंतर पतंग उडवणाऱ्या मुलांनी तिथून पळ काढला.
बंदी असूनही सर्रास विक्री
सामान्यांसाठी जीवघेणा ठरत असलेल्या नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली आहे. तरी याची छुप्या पद्धतीने विक्री सुरु असल्याने पतंड उडवणाऱ्यांना मांजा मिळत आहे. यावर पोलिसांकडूनही कठोर कारवाई होत नसल्याने दरवर्षी अपघातांच्या मालिका सुरु असतात. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतः सुमोटो जनहित याचिका दाखल करुन घेतली असून शासन स्तरावर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
दीड लाखाचे साहित्य जप्त
दरम्यान हुडकेश्वर पोलिसांनी नरसाळा गावात धाड घालून एक लाख 48 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. यामध्ये 186 मांजाच्या चकऱ्या आहेत. प्रतिबंध असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा येत आहे. मात्र, पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत असून तुरळक कारवाई होत असल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. नायलॉन मांजामुळे एकाची हौस तर दुसऱ्याचा गळा कापला जातो. मागच्या वर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे कापले गेले. तरीही नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.
हुडकेश्वर पोलिसांनी शुक्रवारी धाड घालून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा जप्त केला. विक्री करणारे आरोपी अभिजित बोंडे (वय 27 वर्षे) रा. नरसाळा, रियाझ खान अब्दुल रशीद खान (वय 34 वर्षे) रा. आदर्शनगर मोठा ताजबाग, मनीष गोल्हर (वय 28 वर्षे) रा. हुडकेश्वर रोड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा मांजा ऑटोतून आणण्यात आला होता. पोलिसांनी ऑटो सुद्धा जप्त केला आहे.
ही बातमी देखील वाचा...