23 March Headlines : माहीम समुद्रातील दर्ग्याची पाहणी आणि शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक; आज दिवसभरात
23 March Top News : दिल्लीतल्या 6 जनपथ या शरद पवारांच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसलासुद्धा या बैठकीत आमंत्रण असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई: राज ठाकरे यांचे गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणाचे पडसाद आता उमटत असल्याचं दिसून येतंय. माहीम समुद्रातील दर्ग्यावर एक महिन्याच्या आत कारवाई करा अन्यथा त्याच्या बाजूला गणपती मंदिर बांधणार असा इशारा दिल्यानंतर आता मुंबई पोलिस आयुक्तांनी या दर्ग्याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासह आज घडणाऱ्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,
माहीम समुद्रातील दर्ग्यावरुन वाद
माहिमच्या खाडीत भराव टाकुन दरगा उभा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यावर आता मुंबई पोलिस आयुक्तांनी अतिरिक्त पोलिस आयुक्तांना राज ठाकरेंनी माहीम खाडीतील दिलेल्या अनधिकृत बांधकामाची माहिती घ्यायला सांगितली. माहिती घेऊन पाहणी करून अहनाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक आमदार सदा सरवणकर माहीम खाडीत वॉर्ड ऑफिसर सोबत पाहणी करणार आहेत. समुद्रातील आतील भागात बांधकाम असल्याने सदर अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नसल्याचं मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी आज विरोधी पक्ष नेत्यांची बैठक
दिल्लीतल्या 6 जनपथ या शरद पवारांच्या निवासस्थानी संध्याकाळी 6 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसलासुद्धा या बैठकीत आमंत्रण असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीला कोणते नेते उपस्थित राहणार याबद्दल उत्सुकता आहे. तृणमूल, सपाने आपण काँग्रेस, भाजपला समान अंतरावर ठेवणार असल्याचे म्हटले आहे आज होणाऱ्या या बैठकीत ईव्हीएमबद्दल, रिमोट वोटिंगबद्दल निवडणूक आयोगाने जो प्रस्ताव पाठवला आहे त्याबद्दल चर्चेची शक्यता आहे.
विधिमंडळ अधिवेशन
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानाची पंचनामे करून शेतकऱ्यांना लगेच मदत मिळावी यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. सपा आमदारांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे. सभागृहात लव्ह जिहादबद्दल चुकीची माहिती लोढा यांनी दिली, असा आरोप करत सपा आमदार आंदोलन करणार आहेत.
आज विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे. यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्था यावरती विधानसभेत चर्चा होईल. राज्याच्या अनेक ठिकाणी झालेल्या हिंसेच्या घटना, बलात्काराच्या घटना, लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्या या सगळ्या मुद्द्यांवरती विरोधक सरकारला धारेवरती धरण्याची शक्यता आहे.
विनायक राऊत यांची पत्रकार परिषद
शिवसेना खासदार विनायक राऊत यांची सेनाभवन येथे कोकणातील भूखंड घोटाळ्यासंदर्भात पत्रकार परिषद होणार आहे, दुपारी 12 वाजता. रिफायनरी जमीन खरेदी घोटाळा आणि यात काही पत्रकारांची नावे आहेत अशी चर्चा सुरु आहे त्याबाबात काही बोलणार का? याची उत्सुकता आहे.
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाचा हजर राहण्याचा आदेश
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरून केलेल्या टीकेसंदर्भात राहुल गांधींना आज सूरतच्या न्यायालयात हजर राहण्याचा आदेश आहे. या खटल्याचा आज निकाल येणार आहे.
सांगलीत आजपासून महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा
पहिली महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजपासून सांगलीत आयोजित करण्यात आली असून स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत 50, 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटातील मल्ल सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र केसरी विजेत्याला चांदीची गदा देण्यात येणार आहे. ही स्पर्धा फक्त मॅटवर होणार आहे.
अनिल परब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणात ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. ईडीच्या कारवाईपासून परब यांना दिलेलं संरक्षण आज संपत आहे. परब यांच्यावर तूर्तास अटकेची कारवाई न करण्याचा आदेश आहे.