(Source: ECI/ABP News/ABP Majha)
15 September In History :भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले, पहिल्यांदाच झाले दूरदर्शनवरुन प्रसारण; आज इतिहासात
15 September In History : आजच्याच दिवशी जर्मनीमध्ये ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. तर पहिल्या महायुद्धामध्ये पहिल्यांदाचा रणगाड्यांचा वापर करण्यात आला.
15 September In History : आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी इतिहासामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजच्याच दिवशी भारतातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक असलेल्या दूरदर्शन वाहिनीवर पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. तसेच भारतीय सैन्याने निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त केले. तर बंगाली साहित्यिक आणि 'परिणीता' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म देखील आजच्याच दिवशी झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे 15 सप्टेंबर रोजी निधन झाले.
1876 : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्मदिन
प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. 'परिणीता' ही त्यांची गाजलेली कादंबरी आहे. ग्रामीण लोकांची जीवनशैली, शोकांतिका आणि संघर्ष त्यांनी त्यांच्या लिखाणातून मांडला. देवदास, श्रीकांतो, चोरित्रोहिन इत्यादी त्यांच्या काही नावाजलेल्या कादंबऱ्या आहेत.
1916: पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच रणगाड्यांचा वापर
आजच्याच दिवशी पहिल्या महायुद्धामध्ये रणगाड्यांचा वापर करण्यात आला. फ्रान्समधील सोम या शहरात ब्रिटिशांनी पहिल्यांदा रणगाडे अस्र म्हणून वापरले. सोम नदीच्या परिसरात ब्रिटीश, फ्रेंच आणि जर्मन सैन्य दबा धरुन बसले होते. ब्रिटिशांकडून घोडदळ आणि पायदळाचा वापर करुन चढाया करण्यात येत होत्या. पण आजच्याच दिवशी ब्रिटिशांनी मार्क-1 हा रणगाडा वापरण्याचे ठरवले आणि पहिल्या महायुद्धाच्या युद्धभूमीवर रणगाडा अवतरला.
1921: दाजी भाटवडेकर यांचा जन्म
केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर उर्फ दाजी भाटवडेकर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. मराठी रंगभूमी त्यांनी गाजवलीच पण इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केलं. कालिदास महोत्सवाच्या वेळी त्यांनी ’अभिज्ञानशाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून शाबासकी मिळवली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी 40 नाटकांत एकूण 50 भूमिका साकारल्या. अंमलदार, एकच प्याला, तुझे आहे तुजपाशी, मानापमान, संशयकल्लोळ ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
1935: जर्मनीतील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द
हिटलरच्या नाझी पक्षाने जर्मनीमध्ये ज्यू विरोधात अनेक कायदे करण्यात आले. तर आजच्याच दिवशी जर्मनीतील ज्यू लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले. यामुळे जर्मनीतील सर्व ज्यू लोकांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यात आले. तसेच यामध्ये ज्यू आणि जर्मन व्यक्तींना विवाह देखील बेकायदेशीर ठरवण्यात आला. यामध्ये कायदा मोडणाऱ्यांस सक्त मजुरीची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती.
1948 : निजामाच्या वर्चस्वातून औरंगाबाद शहर मुक्त
औरंगाबाद दे शहर निजामाचं वर्चस्व असणारं दुसरं शहर होतं. भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरल्यानंतर त्यांनी तुळजापूर, नळदुर्ग, परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव , कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आजच्याच दिवशी औरंगाबाद शहर निजामाच्या वर्चस्वातून मुक्त केले.
1959 : दूरदर्शनवरून पहिले प्रसारण
दूरदर्शनवरून 15 सप्टेंबर 1959 मध्ये दूरदर्शनचा पहिला कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. शैक्षणिक आणि विकासात्मक विषयांवर आधारित एक तासाचा हा कार्यक्रम होता. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. सुरुवातीला युनेस्कोच्या मदतीने दूरदर्शन आठवड्यातून दोनदा फक्त एक तासाचा कार्यक्रम प्रसारित करत असे. नागरिकांना जागरूक करणे हा त्यांचा उद्देश होता.
इतर महत्त्वाच्या घडामोडी
1835: चार्ल्स डार्विन जहाजातून गॅलापागोस द्वीपात पोहोचले
1905 : नाटककार, समीक्षक व हिंदी कवी राजकुमार वर्मा यांचा जन्म.
1860 : भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांची जयंती
1935: भारताचे पहिले पब्लिक स्कूल द डून स्कूल सुरू झाले.
1953: श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.
2012 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचवे सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचे निधन
2013: निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.