Maharashtra Weather Update: चिंता वाढली! राज्यात अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती; मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा सविस्तर
Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीने अक्षरशः कहर केल्याचे चित्र आहे. असे असताना कायम दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या मराठवाडा आज पुराच्या विळख्यात सापडला आहे.

Maharashtra Weather Update: राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीने (Rain Update) अक्षरशः कहर केल्याचे चित्र आहे. असे असताना कायम दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या मराठवाडा (Marathwada Rain) आज पुराच्या विळख्यात सापडला आहे. या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. यातून सावरण्याचे प्रयत्न सर्व स्थरातून केले जात असताना हवामान विभागाकडून अधिक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात अस्मानी संकट आणखी गडद (Weather Update) होण्याची भीती हवामान विभागाकडून (IMD) व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात आठवडाअखेर पावसाचा जोर राज्यात पुन्हा एकदा वाढणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.
विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची दाट शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर या आठवड्याअखेर कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी, संभाव्य धोका लक्ष्यात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मराठवाड्यात काही तासांत 100 ते 200 मिलिमीटर पाऊस
मराठवाड्याची ओळख कायम दुष्काळी प्रदेश अशी आहे. पुरेसा पाऊस न पडल्याने पेरणी आणि दुबार पेरणीच्या समस्या नेहमीच असतात. मात्र, आता याच मराठवाड्यात काही तासांत 100 ते 200 मिलिमीटर पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तज्ज्ञांनुसार, हे हवामान बदलाचे परिणाम आहेत. लातूरसारख्या शहराला रेल्वेने पाणी पुरवावे लागण्याची वेळ आली होती, त्याच मराठवाड्यात आता अतिवृष्टीचे चित्र आहे. सरासरीच्या दुप्पट-तिप्पट पाऊस झाल्याने लाखो एकर शेतीचे नुकसान झाले आहे. "तीस वर्षांत मराठवाड्याचे वाळवंट होईल असा अंदाज वर्तवला जात असताना, त्याच मराठवाड्यात सरासरीच्या दुप्पट-तिप्पट पाऊस होऊन लाखो एकर शेतीचे नुकसान होते आहे." असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हवामान बदलामुळे होणाऱ्या आर्थिक हानीसाठी भारताने जागतिक परिषदेत मोठी रक्कम मागितली आहे. मराठवाड्यातील विद्यापीठे आणि शेती महाविद्यालयांनी एकत्रित संशोधन करण्याची गरज आहे. नियोजनातील चुका, पाणथळ जागा आणि झाडे नष्ट करणे ही पूरस्थितीची कारणे आहेत. निळी आणि हिरवी क्षेत्रे वाढवण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे.

























