एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
येत्या खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने कंबर कसली!
'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेसंदर्भात भूतकाळातील तक्रारी लक्षात घेता अधिक काळजी घेतली आहे. तीन यंत्रणा स्तरावरुन बीज प्रमाणीकरण केले आहे.
अकोला : येत्या खरीप हंगामासाठी 'महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ' अर्थातच 'महाबीज'ने कंबर कसली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात 'महाबीज'ने तब्बल 5 लाख 97 हजार क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 4.30 लाख क्विंटलचा वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्व प्रकारचं 60 हजार क्विंटल बियाणे कमी येणार आहे. शेतकऱ्यांची मागणी वाढल्यास अतिरिक्त बियाण्यासाठी 'महाबीज'नं तयारी केली आहे.
यावर्षीच्या खरिपासाठी 'महाबीज'ची तयारी पूर्ण झाली आहे. 'महाबीज'चं 50 टक्के बियाणं सध्या बाजारात आलं आहे. यावर्षी 'महाबीज'नं खरिपासाठी 5 लाख 97 हजार क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं आहे. यातील 5 लाख 58 हजार क्विंटल बियाणं सध्या महाबीजकडे उपलब्ध आहे. मागच्या वर्षी हाच आकडा 6.59 लाख क्विंटल एवढा होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची संभाव्य वाढीव मागणी लक्षात घेता या पिकाचं क्षेत्र सरासरीपेक्षा 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यावर्षीही 'महाबीज' बियाण्यांमध्ये सर्वाधिक वाटा हा सोयाबीन बियाण्यांचा असेल. सोयाबीन बियाण्याचा वाटा यामध्ये 4 लाख 30 हजार क्विंटल एवढा असेल. ऐनवेळी मागणी वाढल्यास अतिरिक्त 20 हजार क्विंटल बियाण्यांची तयारी महाबीजनं ठेवली आहे.
'महाबीज'चे खरिपासाठी बियाणे विक्री नियोजन :
विक्रीसाठी उपलब्ध बियाणे (क्विंटलमध्ये)
1) सोयाबीन – 4.30 लाख क्विंटल
2) तूर – 16,554 क्विंटल
3) मूग – 7,031 क्विंटल
4) उडीद – 15,205 क्विंटल
5) धान – 63,060 क्विंटल
गेल्या वर्षीच्या तुलनेत 'महाबीज'च्या खरीप बियाण्याच्या उपलब्धतेत 60 हजार क्विंटलनं कमी आली आहे. पुढच्या काळात हा प्रश्न सोडवण्यासाठी 'महाबीज'नं ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. 2017 चा रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्यासाठी हा कार्यक्रम महाबीजनं राबवला होता.
दरवर्षी 'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात होत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर 'महाबीज'ने विशेष खबरदारी घेतली आहे.
यावर्षी त्रिस्तरीय प्रमाणीकरणानंतर उगवण क्षमता तपासण्यासाठी सोयाबीन बियाण्यांची शेतचाचणी करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. मात्र, 70 ते 80 टक्के पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, असा सल्ला 'महाबीज'नं शेतकऱ्यांना दिला. याशिवाय शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं कमी पडू देणार नसल्याचा विश्वासही 'महाबीज'नं दिला आहे.
'महाबीज'च्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेसंदर्भात भूतकाळातील तक्रारी लक्षात घेता अधिक काळजी घेतली आहे. तीन यंत्रणा स्तरावरुन बीज प्रमाणीकरण केले आहे. पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा, सोयाबीन बियाणे कमी पडले तर वेळेवरची पर्यायी व्यवस्था तयार आहे.
'महाबीज'ने जुन्या चुका टाळत विश्वासार्ह बियाणे शेतकऱ्यांना पुरविणे आवश्यक आहे. तरच जनतेच्या मालकीचं हे महामंडळ खऱ्या अर्थाने अधिकाधिक लोकाभिमुख होईल, यात तिळमात्रही शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement