लातूर भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी, बाजार समितीच्या निमित्ताने भाजपचे संभाजी निलंगेकर आणि अभिमन्यू पवार पुन्हा आमने-सामने
Nilanga APMC : घर मोठं झालं की संघर्ष होतात, पक्ष मोठा झाला की काही मतभेदही असतात असं माजी मंत्री संभाजी पाटलांनी म्हटलं आहे.
लातूर: बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने लातूर भाजपमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमधील संभाजी पाटील आणि अभिमन्यू पवार हे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. घर मोठं झालं की संघर्ष होतात, पक्ष मोठा झाला की काही मतभेदही असतात, पण प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार असल्याचं माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलंय. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अभिमन्यू पवार आमने-सामने आले आहेत.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाचे दोन पॅनल आहेत. एक आहे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा, तर दुसरा आहे आमदार अभिमन्यू पवार यांचा. तिसरं पॅनल आहे महाविकास आघाडीचा. भाजपातल्या गटबाजीमुळे इथे दोन पॅनल उभे आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अभिमन्यू पवार यांनी आरोप केला की मतदारांना खोटी कारण देत बोलावून घेतलं जातं आणि त्यांना जबरदस्तीने आज्ञतस्थळी नेले जात आहे. यावर संभाजी पाटील यांनी उत्तरही दिलं आहे. निवडणूक आहे, असे अनेक आरोप होत राहतात, त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नये असं ते म्हणाले.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांची पळावापळवी केल्याचा आरोप होतोय. आमदार अभिमन्यू पवार यांनी आरोप केलाय की मतदारांना खोटी कारणे सांगून अज्ञात स्थळी पळवून नेल्याचा आरोप केला जात आहे. अशातच एक कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल होते. ज्यामध्ये या मतदारांना सोलापुरातील हॉटेल सूर्यामध्ये आणल्याच बोललं जातंय. हॉटेल सूर्या या ठिकाणी 250 हून अधिक लातूर जिल्ह्यातील नागरिक असल्याची माहिती आहे. यासाठी हॉटेल मध्ये 50 हून अधिक रूम देखील बुक करण्यात आली आहेत. शुक्रवारी संध्याकाळपासूनच सगळे लोकं हॉटेल सूर्यामध्ये मुक्कामी असून रविवारी सकाळपर्यत मुक्कामी असणार आहेत. चार मोठ्या बस आणि दोन जीपमधून या सगळ्यांना आणण्यात आलं आहे.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाची सत्ता
औसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेला ठाकरे गटाला आपली सत्ता राखता आली नाही. भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मोर्चेबांधणीला यश आले असून या ठिकाणी18 जागेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकहाती विजय
आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी केलेल्या मोर्चे बांधणीला यश आलं आहे. भाजपाचे आमदार रमेश कराड यांचं त्यांना आव्हान होतं. भाजपातलं गटातटाचं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचाच फटका भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. 18 जागा एकहाती स्वतःकडे खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे.
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकत्रित विजय झाला आहे. या ठिकाणाहून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडली होती. 18 जागापैकी तब्बल 17 जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विजय मिळवला आहे. भाजपाकडून काँग्रेसमध्ये गेलेले शिवाजीराव हुडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती.