Maharashtra Rain: पहिल्याच मोठ्या पावसात लातुर जिल्ह्याचं चित्र बदललं; ओढे, नाले, शेतात पाणी, वीज पडून एक म्हैस ठार
Maharashtra Rain: लातूर शहरासह जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.
लातूर- लातूर जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या प्रारंभीला पावसाने (Rain Maharashtra) जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. लातूरसह जिल्ह्यातील अनेक गावात काल संध्याकाळपासून धुवाधार पावसाने हजेरी लावली होती. लातुर शहर आणि परिसरात रात्री ८ वाजेपासून मोठ्या पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस मध्यरात्रीपर्यंत होता. सकाळपर्यंत पावसाची सातत्याने रिमझिम सुरूच होती.
सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्रभर जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. लातूर शहरासह जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार, सोमवारी पावसाने झोडपून काढले. लातुरातील पाच नंबर चौकात, प्रमुख रस्त्यावर, पूर्व भागातील सखल भागात पाणी साचले होते, तर काहींच्या घरात पाणी शिरले.
लातूर शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी-
लातूर शहरासह जिल्ह्यातील बोरगाव काळे, हरंगुळ बु., रेणापूर, येरोळ, निलंगा शहरासह तालुक्यातील निटूर, औराद शहाजानी, हलगरा, कासार शिरसी, औसा शहरासह तालुक्यातील खरोसा, बेलकुंड, चाकूर सह तालुक्यातील काही गावांत पावसाने हजेरी लावली होती. उदगीर तालुका ..अहमदपूर आणि जळकोट तालुक्यातील ही पावसाने हजेरी लावली होती.
वाहतुकीवर झाला परिणाम....
छोट्या आणि अरुंद पुलावरून पाणी जात असल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. यात निलंगा तालुक्यातील कासार शिरशी पुलावरून पाणी गेल्याने दहा गावाचा संपर्क दोन तासासाठी तुटला होता. लातूर जहीराबाद रस्त्यावरील औराद शहाजानी जवळील पुलावरून पाणी जात असल्याने कर्नाटक महाराष्ट्रला जोडणाऱ्या रस्त्या वरची वाहतूक ठप्प झाली. अनेक ठिकाणी रस्त्यावर अरुंद आणि छोट्या पुलावरून पाणी जात असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी वाहतूक थांबून अंदाज घेतला जात आहे . मागील पाच दिवस सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे छोट्या मोठ्या नदी नाली ओढ्यांना पाणी आलं होतं. त्यातच काल संध्याकाळपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तेरणा नदी पात्रात पहिल्याच पावसात काठोकाठ पाणी भरून वाहत आहे.
पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात २ टक्के साठा वाढला-
लातूर जिल्ह्यातील रेणापूर मध्यम प्रकल्पात गेल्या तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे येवा सुरू झाला आहे.काल संध्याकाळपर्यंत दोन टक्के पाणीसाठा वाढला होता. रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे येवा वाढला आहे. पाणीपातळी आणखीन मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. रेणापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रेणा मध्यम प्रकल्पात दोन टक्के वाढ झाली आहे. प्रकल्पामध्ये ३.४० दलघमी जलसाठा आहे.पाण्याचा येवा अजून सुरूच आहे. पाणीसाठा आणखीन वाढण्याची श्यक्ता आहे. जलसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.