Latur News : पोलीस ठाण्याच्या आवारातच तरुणाने पेटवून घेतले; रुग्णालयात उपचार सुरु
Latur News: याबाबत पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur News: लातूर शहरात (Latur City) एक धक्कादायक घटना समोर आली असून, बीड (Beed) जिल्ह्यातील एका 26 वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले. सोमवारी (30 जानेवारी) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या आवारात हा सर्व प्रकार घडला असून, याबाबत पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजपाल कचरु बनसोडे (वय 26 वर्षे रा.लोखंडी सावरगाव ता.अंबाजोगाई जि.बीड ह.मु. एलआयसी कॉलनी, लातूर) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या आवारात सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास राजपाल बनसोडे पोहोचला. दरम्यान यावेळी कोणालाही काहीही समजण्याच्या आत त्याने अचानकपणे स्वत:ला पेटवून घेतले. राजपालने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर उपस्थित पोलिसांनी तातडीने धाव घेत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने भाजलेल्या तरुणाला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर यामध्ये राजपाल जवळपास 30 टक्क्यांवर भाजल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव...
दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर राजपाल यांनी स्वतःला पेटवून घेतल्याने विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात काही वेळेसाठी गोंधळ उडाला आहे. सर्वत्र धावपळीचे वातावरण होते. तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधिकारी अजय देवरे, पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, सहायक पोलीस निरीक्षक खंदारे, पोलीस उपनिरीक्षक सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. मात्र राजपाल याने टोकाचे पाऊल उचलण्याचा का प्रयत्न केला? याचे उत्तर अजूनही मिळू शकले नाही.
पोलिसात गुन्हा दाखल...
हवालदार सुनील हराळे (वय 54 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन राजपाल बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या आवारात राजपालने पेटवून घेतल्याने त्याच्याविरोधात गुरनं. 74/2023 कलम 309 भादंविप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे करत आहेत. विशेष म्हणजे राजपाल याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला याबाबत दुसऱ्या दिवशी देखील खुलासा होऊ शकला नाही. त्यामुळे त्याचा तपास देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Latur Scam: लातुरात लिपिकाने केलेला घोटाळा पोहचला 26 कोटींवर; नव्या माहितीनं खळबळ