(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Latur : लातुरात गेल्या नऊ दिवसांपासून इंटर्न डॉक्टरांचं आंदोलन; विद्यावेतन न दिल्याने आक्रमक
Latur : एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टर्सना विद्यावेतन न मिळाल्याने डॉक्टरांकडून मागील नऊ दिवसांपासून आंदोलन करण्यात आले आहे.
Latur : एमआयएमएसआर (MIMSR) मेडिकल कॉलेज येथील इंटर्न डॉक्टर्स यांनी मागील नऊ दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाच्या सूचना असतानाही विद्यावेतन (Stipend) देण्यातयेत नसल्याने काम बंद आंदोलन सुरु आहे. याच संदर्भात आज महाविद्यालयील प्रांगणात शांततापूर्ण हे आंदोलन करण्यात आलं.
मागील नऊ दिवसांपासून आंदोलन सुरु
एमआयएमएसआर मेडिकल कॉलेजमधील इंटर्न डॉक्टर्सना विद्यावेतन अद्याप देण्यात आले नाही. यासाठी मागील नऊ दिवसांपासून इंटर्न डॉक्टरांनी जोरदार घोषणाबाजी करत काम बंद आंदोलन केले आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
लातूर येथील एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज येथील 136 इंटर्न डॉक्टर्स 9 दिवसांपासून काम बंद आंदोलन करत आहेत. विद्यावेतन तात्काळ देण्यात यावे या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, काम बंद आंदोलन केल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आज जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला.
काय आहे शासन निर्णय?
केंद्र सरकारकडून N.M.C. द्वारे 18 नोव्हेंबर 2021 रोजी एक शासन निर्णय देण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर्सना विद्यावेतन देण्याची सूचना देण्यात आलेली आहे. या शासन निर्णयातील Schedule 4 Article 3 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की, "सर्व इंटर्नना संस्था/विद्यापीठाला लागू असलेल्या योग्य प्राधिकाऱ्याने निश्चित केल्यानुसार स्टायपेंड दिला जाईल." या निर्णयानुसार यापूर्वी जी महाविद्यालये विद्यावेतन देत नव्हती त्यांनी यावर्षी पासून विद्यावेतन (stipend) देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज येथे डॉक्टर्सकडून काम करून घेतले जाते. वारंवार मागणी करूनही विद्यावेतन देण्यात येत नाही. मागील दोन महिन्यांपासून सर्व प्रकारच्या चर्चा आणि बैठका झाल्या मात्र यावर अजूनही काही निर्णय होत नाही.
प्रमुख मागण्या :
1. NMC CRMI guidelines 2021 नुसार आम्हाला विद्यावेतन (stipend) देण्यात यावे.
2. विद्यावेतन हे संपूर्ण कालावधी साठी म्हणजेच 12 महिन्यासाठीचे मिळावे.
3. याबद्दल कॉलेज प्रशासनाकडून आमच्या मागण्या मान्य केल्याची आम्हाला लेखी आश्वासन द्वारे पुष्टी देण्यात यावी.
4. याबद्दलची अंमलबजाणी एका आठवड्यात करण्यात यावी.