Latur News : लातूरमधील महामार्गामध्ये येणारा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा स्थलांतरित होणार नाही, नितीन गडकरींचं आश्वासन
Latur News: महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याचे स्थलांतर होणार नसल्याची माहिती मिळताच लातूर शहरात फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला.
लातूर: लातूर (Latur News) जिल्ह्याचे राजकारण हे पाणी आणि महात्मा बसवेश्वरांचा पुतळा याच भोवती मागील अनेक वर्षापासून फिरत आहे. रत्नागिरी - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून जात आहे. या रस्त्यावर असलेला महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा हलवण्यासंदर्भातली चर्चा जोर धरत होती. रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गामधील लातूरमध्ये असलेला महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थलांतरित केला जाणार नाही, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लातूरच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361चं काम युद्धपातळीवर सुरू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग लातूर शहरातून गेलेला आहे. या महामार्गावर येणारा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा हटवण्यासंदर्भातचा हालचाली प्रशासनाकडून सुरू होत्या. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लातूर येथे सर्व स्तरातून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. डॉ. अरविंद भातंबरे आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी 19 एप्रिलपासून चार दिवस आमरण उपोषण करत विषयाला धार दिली होती. त्यानंतर लातूर येथील सर्वच राजकीय पक्ष संघटना यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत पुतळा हलवू नये अशी मागणी केली होती. प्रशासनाने लोकभावना लक्षात घेऊन निर्णय होणार असे लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना दिले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं होतं.
या आंदोलनस्थळी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी भेट दिली. उपोषण करताना पुढील काही दिवसातच दिल्लीत या नितीन गडकरी यांच्यासह चर्चा करू आणि मार्ग काढू असं आश्वासन दिलं होतं त्यानुसार काल लातूर येथील शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झाले. खासदार सुधाकर शिंगारे यांच्याबरोबर त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली. सर्व परिस्थितीची माहिती नितीन गडकरी यांना देण्यात आला. त्यानंतर नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थलांतरित केला जाणार नाही, तो पुतळा आहे तिथेच राहणार. याबाबत प्रशासकीय कामकाज लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती लातूर शहरात आली त्यावेळी लातूर शहरांमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सर्व बसव प्रेमी जमा झाले होते. एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला. महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा वाद हा लातूरला काही नवीन नाही. विलासराव देशमुख सारख्या नेत्यांचा पराभवाचे एक कारण ही महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याचा विषयच होता.