Latur Politics : अभिमन्यू पवारांप्रमाणेच आमच्यावरही प्रेम ठेवा, तुमचं सहकार्य अपेक्षित; भाजप खासदार सुधाकर शृंगारेंची अमित देशमुखांकडे मागणी
Maharashtra Latur News: आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर जसे प्रेम आहे, तसेच आमच्यावरही ठेवा, तुमचे सहकार्य अपेक्षित, असं म्हणत भाजपाचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी जाहीर भाषणात अमित देशमुखांकडे मागणी केली आहे.
Maharashtra Latur News: लातूरचं (Latur News) राजकारण कायमच देशमुखांच्या अवतीभोवती फिरत असतं. सत्ता कोणाचीही असो, देशमुख कायमच चर्चेत असतात. लातूरचे भाजप खासदार सुधाकर शृंगारे (MP Sudhakar Shingare) आणि लातूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे (Congress) आमदार अमित देशमुख (Congress MLA Amit Deshmukh) हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकाच मंचावर आले होते. सोबतीला होते औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar). या कार्यक्रमात खासदार सुधाकर शृंगारे यांनी हसत हसत अभिमन्यू पवार आणि अमित देशमुख यांच्यातील राजकीय समीकरणात आम्हालाही थोडी संधी द्या म्हणत, जाहीर मागणी केली.
लातुरात आज महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचा आज उद्घाटनाचा दिवस होता. यावेळी हे तीनही नेते एकाच मंचावर आले होते. यावेळी भाजपच्या खासदारांनी केलेल्या भाषणात अमित देशमुख यांनी त्यांच्यावरही अभिमन्यू पवार यांच्यासारखंच प्रेम करावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
काय म्हणाले खासदार सुधाकर शृंगारे?
"अमित भय्या जसे, अभिमन्यू यांच्यावर आपलं प्रेम आहे, तसंच आमच्यावरही थोडं प्रेम करा. आशीर्वाद असू द्या. आपली आणि माझी कधीच भेट झाली नाही. एका मंचावर आपण पहिल्यांदा आलो आहोत. आपल्यासमोर मी पहिल्यांदाच बोलतोय. मनात भीती होती. भय्या कधी भाषणात चिमटे घेतील सांगता येत नाही. मात्र त्यांनी तसे काही केलं नाही. मला चिमटे घेता येत नाहीत," असं म्हणत खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाषणात आणखी रंगत आणली.
मदतीची अपेक्षा का?
औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार अभिमन्यू पवार यांना अमित देशमुख यांनी निवडणुकीत मदत केली होती. यामुळे काँग्रेसचे उमेदवार बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव झाला होता, अशी चर्चा कायमच राजकीय वर्तुळात होत असते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार सुधाकर शृंगारे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. अभिमन्यू पवार यांना ज्या पद्धतीने देशमुख गटाने निवडणुकीत सहकार्य करत विजयाचा मार्ग सुकर केला होता, तसाच आमचाही मार्ग थोडाफार का असेना, सुकर करावा, असं खासदारांचं म्हणणं होतं की काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
खासदार सुधाकर शृंगारेंना देशमुखांच्या मदतीची गरज का भासली?
खासदार सुधाकर शृंगारे यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी काँग्रेस पार्टीचे उमेदवार हे तुल्यबळ नव्हते किंवा देशमुखांची त्यांना पसंती नव्हती. यामुळे देशमुख गट सर्व शक्तीनं मैदानात उतरला नव्हता. याचा परिणाम निवडणूक निकालांमध्ये दिसून आला. भाजपचा विजय अतिशय सहजपणे झाला होता. यावेळी अमित देशमुख हे सर्वशक्तीनिशी उतरले, तर निवडणूक चुरशीची होईल, याचा अंदाज खासदार सुधाकर शृंगारे यांना आला असल्यानेच त्यांनी सावध भूमिका मांडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, श्रृगांरे यांच्या वक्तव्यानंतर लातुरात चर्चांना उधाण आलं आहे.