दुष्काळात तेरावा! पुराचे अश्रू पुसेपर्यंत पुन्हा पाऊस कोसळला; लातुरात 3 पूल पाण्याखाली, रस्ते ठप्प, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Latur Rain: रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Latur News:लातूर जिल्ह्यात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रात्रभर मेघगर्जनेसह पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे अनेक रस्ते, पूल आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत. पावसाचा जोर इतका होता की नागरिकांना घराबाहेर जाणे कठीण झाले असून, रस्त्यांवर वाहतुकीची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. (Latur Flood)
पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
निलंगा तालुक्यातील उस्तुरी, टाकळी आणि बडूर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. सांगवी, जेवरी, अंबुलगा बुद्रुक तसेच निलंगा ग्रामीण भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. लातूर ग्रामीणमधील मुरुड आणि परिसरातील अनेक भागांतही सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. नागरिकांनी रस्त्यावर जाण्यापासून स्वत:ला वाचवले तर काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याचे अहवाल देखील मिळाले आहेत.
पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा
रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने पुढील काही तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने पावसामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच, नदी-नाले ओलांडताना आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून सावधगिरी बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
पाच दिवसांच्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला होता. अनेकांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली होती. मात्र, या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या कष्टावर पुन्हा एकदा पावसाने पाणी फेरल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नदी-नाल्यांना पूर ,जनजीवन विस्कळीत
जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागांत पाणी रस्त्यांवर येऊन वाहतुकीला पूर्णतः अडथळा निर्माण केला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि प्रवासी सर्वच चिंता व्यक्त करत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळून सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अजून काही तास पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन सातत्याने नजर ठेवत आहे आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी तत्पर आहे.























