Latur News: बाजार समिती मतमोजणीत निवडणूक अधिकाऱ्यांना धक्काबुक्की; भाजपच्या माजी आमदाराविरोधात गुन्हा दाखल
Latur News: लातूर अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीच्या दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपचे माजी आमदार विनायक पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Latur News: लातूरमधील अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी भाजपाचे माजी आमदार प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील यांच्यासह चार जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या.
अनेक ठिकाणच्या बाजार समितीच्या निवडणुका अतिशय चुरशीच्या झाल्या. काही ठिकाणी तणावही दिसून आला होता. अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी सुरू असताना निवडणूक निर्णय अधिकारी यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली होती. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या तक्रारीनंतर अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर 23 वर्ष भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती. काही वर्ष प्रशासकांची नियुक्ती बाजार समितीवर करण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने 18 पैकी 13 जागेवर विजय मिळवला आहे. भाजपाच्या हातून सत्ता निसटली आहे. बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना माजी आमदार विनायकराव पाटील आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी मतमोजणी केंद्रावर जात गोंधळ घातला. निवडणूक निर्णय अधिकारी यांना धक्काबुक्की केली होती. मध्यरात्रीनंतर अहमदपूर पोलिसात याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी वसंत घुले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर पोलिसांनी विनायकराव पाटील, कल्याण बदने, बालाजी गुट्टे यांच्यासह इतर एकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 332, 171 एफ, 114 आणि 34 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात दोन टप्प्यात 10 बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. औसा बाजार समितीची सत्ता भाजपाकडे गेली आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेले निलंगा आणि औराद शहाजानीवर भाजपाचा झेंडा लागला आहे. रेणापूर, लातूर, उदगीर, अहमदपूर आणि जळकोट या कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काही वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. यावेळेस ही महाविकास आघाडीला या बाजार समितीची सत्ता आपल्याकडे ठेवण्यात यश आले आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच गाजली. भाजप आमदार रमेश कराड यांनी धीरज आणि अमित देशमुख या आमदार बंधू विरुद्ध जोरदार मोर्चे बांधणी केली होती. मात्र त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपला यश मिळाले नाही. रेणापूरमध्ये भाजपला एकही जागा मिळवता आली नाही.
औसा कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील काही वर्षापासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र, यंदा भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना सत्ता खेचून घेण्यास यश आले आहे. भाजपने 18 पैकी 18 जागेवर भाजपाचा विजय मिळवला आहे. चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता भाजपाला स्वतःकडे टिकवून ठेवण्यात यश मिळाले आहे,.
इतर महत्त्वाच्या बातम्या: