Kolhapur News : निष्ठावंतांची चेष्ठा अन् गद्दारांची प्रतिष्ठा, भाजप हद्दपार होण्याच्या मार्गावर, चंद्रकांतदादा लक्ष द्या! बाजार समितीच्या मतपेटीत चिठ्ठी
Kolhapur Bajar Samiti Election: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्येही सभासदांनी भावना व्यक्त केल्या आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांनाही भाजपकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Kolhapur Bajar Samiti Election : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक (Kolhapur APMC Election) पार पडली. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सत्ता अबाधित ठेवताना 18 पैकी 16 जागांवर विजय मिळवला आणि विरोधी आघाडीला अवघ्या एक जागेवर समाधान मानावं लागलं, तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला. यामुळे पुन्हा महाविकास आघाडीची कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता कायम राहिली आहे.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सभासदांनी सत्ताधारी आणि विरोधी कारभाऱ्यांना कानापिचक्या चिट्ट्यांच्या माध्यमातून दिल्या होत्या, तशाच पद्धतीने कानपिचक्या यावेळी सुद्धा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्येही सभासदांनी नेत्यांना चांगल्याच दिल्या आहेत. यामध्ये सर्वच नेत्यांना फैलावर घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही भाजपकडे लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये दोन कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठ्या चांगल्याच लक्षवेधी ठरल्या आहेत. या चिठ्ठ्यांमधून पक्षाकडे लक्ष देण्यासह निष्ठावंतांना न्याय देण्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
एका कार्यकर्त्याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की,
चंद्रकांतदादा मार्केट कमिटीला भाजपचा उमेदवार कुठे आहे, नाव भाजपचं आणि काम गटाचं. महाडिक गट, घाटगे गट, देसाई गट, आवाडे गट असे सगळे गटच. भाजप संघटना जिल्ह्यातून जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. हे गट सत्ता आहे म्हणून आहे सत्ता गेली हे गेली मग हुडकता (शोधणे अशा अर्थाने) जुने कार्यकर्ते. स्वतःचा कार्यकर्ता मोठा करावा लागतो, तर नंतर नेता पक्ष मोठा होतो. तुम्ही केला पीएना मोठे, जमत असेल तर बदल करा नाहीतर चालू दे आम्हाला काही फरक पडतो.
आणखी एका चिट्टीमध्ये म्हटलं आहे की,
दादा थोडं निष्ठावंतांकडे मागे वळून पहा कारण की निष्ठावंत चेष्टा व गद्दारांची प्रतिष्ठा हे कुठेतरी थांबलं पाहिजे. दादा तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत तरी त्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका.
आपलाच निष्ठावंत कार्यकर्ता
मरेपर्यंत...
स्वाभिमानी मतदाराकडून मतपेटीतून पैसे परत
दरम्यान, कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भलताच प्रकार समोर आला. मतासाठी देण्यात आलेले हजार रुपये एका प्रामाणिक मतदाराने पाकिटात आहे तसेच घालून मतपेटीत टाकून दिले आहेत. ते पैसे कोणी दिले याचा उल्लेख न करता त्यांनी ते निवडणूक आयोगाला पैसे परत पाठवून देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मतांसाठी पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांना एकप्रकारे चपराक दिली आहे. मतपेटीत एका स्वाभिमानी मतदाराने मिळालेले हजार रुपये तसेच मतपेटीत टाकले होते. पाकिट उघडले असता त्यामध्ये पाचशेच्या दोन नोटा आढळून आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या