Latur Rains : 30 मिनिटं ढगफुटीसारखा पाऊस, पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार वाहून गेला, एक जण बचावला
Latur Rains : औसा तालुक्यातील लामजाना, अपचुंदा, जयनगर परिसरात अवघ्या तीस मिनिटात ढगफुटीसारखा पाऊस पडला. पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लातूरकडे जाणारी एक दुचाकी पुलाच्या मध्यभागी आल्यावर वाहून गेली. यावर दुचाकीवर दोनजण प्रवास करत होते.
Latur Rains : लातूर (Latur) जिल्ह्यात रात्री साडे सात वाजल्यानंतर अनेक ठिकाणी तुफान पाऊस (Rain) झाला. औसा (Ausa) तालुक्यातील लामजाना, अपचुंदा, जयनगर परिसरात अवघ्या तीस मिनिटात ढगफुटीसारखा पाऊस पडला. या पावसामुळे लहान-मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांना प्रचंड पाणी आले. लामजना ते लातूर अपचुंदा मार्गावर...अपचुंदा आणि जयनगर या दोन गावाच्या मधून वाहणाऱ्या ओढ्याला तुफान पाणी आले होते. पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लातूरकडे जाणारी एक दुचाकी पुलाच्या मध्यभागी आल्यावर वाहून गेली. यावर दुचाकीवर दोनजण प्रवास करत होते. यातील एका व्यक्तीला झाडाचा आधार मिळाला. पंधरा मिनिट वाचण्याची धडपड सुरु होती. पाणी वाढले आणि तो पाण्यात वाहून गेला. तर दुसऱ्या व्यक्तीला गावकऱ्यांनी वाचवले.
मृत व्यक्तीचे नाव आशिष कृष्णराव येणकर असल्याची माहिती समोर आली आहे तर संतोष बसवराज बिडे या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. मूळ बाभळगाव येथील रहिवासी असलेले दोघे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते. नित्याप्रमाणे काम संपवून ते घराकडे निघाले होते.
अपचुंदा गावातील तरुणांनी तात्काळ प्रशासनाला संबंधित घडनेची माहिती देण्याचं काम केलं. "या रस्त्यावरुन प्रवास धोक्याचा आहे हे लक्षात येताच अपचुंदा आणि जयनगर गावातील तरुणांना पुलाच्या दोन्ही बाजूला उभे केले. मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. प्रशासकीय अधिकारी आले आहेत,"अशी माहिती प्रत्यकदर्शी विनोद झिरमिरे यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच औसाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार भरत सूर्यवंशी हे इतर कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी हजर झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. वाहून व्यक्तीला शोधण्याचे काम सुरु आहे. एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.
लामजना लातूर अपचुंदा मार्ग हा अंतर्गत रस्ता आहे. लातूरला येण्यासाठीचा जवळचा मार्ग म्हणून अनेक दुचाकीस्वार या रस्त्याचा वापर करत असतात. या रस्त्यावर अनेक ओढ्यावर छोटे छोटे पूल आहेत. मोठा पाऊस झाला तर या पुलावरुन पाणी वाहते आणि त्या पाण्याचा अंदाज अनेक वेळा प्रवाशांना येत नाही आणि यातूनच असे अपघात होत असतात. या पुलांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.
संबंधित बातम्या
Latur News : लातूरमध्ये जोरदार पाऊस; उदगीरकडे जाणारा राज्यमार्ग बंद; 'हा' पर्यायी रस्ता