Kurla Bus Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाला रुग्णालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या; जखमींकडून पैशांची मागणी
Kurla Bus Accident : कुर्ला पश्चिम परिसरामध्ये घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आदेशाची पायमल्ली होते आहे का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.
कुर्ला: कुर्ला पश्चिम परिसरामध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने (Kurla Bus Accident) संपूर्ण मुंबई शहर हादरलंय. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्याचवेळी बसने काही नागरिकांना देखील चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे.
दरम्यान पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी चालक संजय मोरे याचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. या इलेक्ट्रिक बसची (Kurla Bus Accident) पाहणी करण्यात आली आहे. तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणावर दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांच्या आदेशाला रुग्णालयाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला लावल्या वाटाण्याच्या अक्षता?
कुर्ला येथे सोमवारी रात्री उशिरा एका बस वर नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. यात 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमी झाले आहेत. यात अख्तर खान नावाच्या इसमाला ही दुखापत झाली आहे. दरम्यान या रुग्णाला इस्पितळ प्रशासनाकडून बाहेरून एमआरआय करा, असे सांगण्यात आले आहे. रुग्णाच्या मते कालच्या घटनेत पैसे, पाकीट आणि रिक्षाचा चुराडा झाला आहे. तर मोबाईल ही हरविला आहे. अख्तर खान यांच्या मुलीने ABP माझा शी बोलताना म्हंटल आहे की, आम्ही नालासोपाराला राहतो. माझे बाबा फक्त कमवते आहे. ते रिक्षा चालवितात पण आता बाहेरुन MRI करायला सांगितले जात आहे, त्याचा खर्च 6000 रुपये इतका आहे. त्यामुळे हे पैसे द्यावे कसे असा मोठा प्रश्न अख्तर खान यांच्या कुटुंबियांपुढे उभा आहे. मात्र एकीकडे या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्याचे आदेश देण्यात आले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आदेशाची पायमल्ली होते आहे का? असा ही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
मृतदेह नेण्यासाठीही पैसे मागताय
सरकारने या घटनेनंतर आम्हाला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही मदत आम्हाला नको, मात्र अपेक्षित कारवाई करा, अशी मागणी मृत कणिस फातिमा यांचा मुलगा आबिद शेख यांनी केली. कुर्ल्यात आपण अपघातस्थळ पाहिलंत तर 'दिव्याखाली अंधार' अशी परिस्थिती आहे. पालिका कार्यालय, पोलीस चौकी असताना तिथे अनधिकृत फेरीवाले बसतात तरी कारवाई होत नाही, अशी प्रतिक्रिया आबिद शेख यांनी केली. एबीपीच्या माध्यमातूनच कळालं की, चालकाला ट्रेनिंगच न दिल्याने हा प्रकार घडला. फार वाईट आहे. आमच्यावर काय आघात झाला हे आम्हाला सांगताही येत नाही आहे. अशात मृतदेह नेण्यासाठीही आमच्याकडे पैसे मागितले जात आहेत. यापेक्षा वाईट काय असेल, अशी प्रतिक्रिया कणिस फातिमा यांचा मुलगा आबिद शेख याने दिली.
नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा