Bidri Sakhar Karkhana Result : बिद्री कारखाना निवडणूक निकालादरम्यान राडा; अति उत्साही कार्यकर्ते गेले पोलिसांच्या अंगावर धावून
Bidri Sakhar Karkhana : कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी पोलिसांकडून सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तोडले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कोल्हापूर : अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री साखर कारखान्यात (Bidri Sakhar Karkhana Result) सत्ताधारी के. पी. पाटील यांच्या महालक्ष्मी आघाडीने बाजी मारली आहे. मात्र, मतमोजणी केंद्रात जाऊ न दिल्याने अतिउत्साही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. कारखान्याची मतमोजणी कोल्हापुरातील मुस्कान लाॅनला पार पडली. यावेळी राजकीय संवेदनशीलता लक्षात घेता पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे कोणालाही मतदान केंद्रावर सोडले जात नव्हते.
याचाच राग मनात धरून जमलेल्या कार्यकर्त्यांकडून पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. यावेळी पोलिसांकडून सुरक्षेसाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील तोडले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुसरीकडे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधी परिवर्तन आघाडीने जोर लावून सुद्धा त्यांची सपशेल हार झाली आहे. या निवडणुकीत सात साखरसम्राट उतरल्याने टोकाची राजकीय चुरस निर्माण झाली होती. अखेर जिल्ह्यातील सर्वाधिक सभासद असलेल्या कारखान्यात के. पी. पाटील यांनी सत्ता राखली आहे.
बिद्रीच्या फडात सत्ताधाऱ्यांचे "विमान सुसाट"
दरम्यान, बिद्री साखर कारखान्याची धुरा माजी आमदार के.पी. पाटील यांच्याकडे पुन्हा आली आहे. ही निवडणूक अत्यंत चर्चेची अन् अत्यंत चुरशीची अशी झाली. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आघाडीकडून हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी बळ लावलं होतं, तर विरोधी आघाडीकडून खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक आमदार प्रकाश आंबिटकर, समरजितसिंह घाटगे यांनी बळ लावले होते. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सत्तांतर होणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, पुन्हा एकदा निकालामध्ये कारखान्याच्या सभासदांनी के. पी. पाटील यांच्या कारभारावर विश्वास केला आहे.
मतमोजणीत कल कायम राहिल्याने विरोधी आघाडीचा महत्त्वाचा चेहरा असलेल्या ए. वाय. पाटील यांनी मतदान केंद्रावरून काढता पाय घेतला. त्यामुळे याची चर्चा सोशल मीडियामध्ये सुद्धा रंगली. मतदारांनी मतदान करताना चिट्ठ्यांमधूनही आपला राग व्यक्त केला. ज्या पद्धतीने सत्ताधारी के. पी. पाटील यांना कानपिचक्या दिल्या आहेत, त्याच पद्धतीने ए. वाय. पाटील यांना सुद्धा दिल्या आहेत. त्यामुळे सभासदांना या दोघांमध्ये झालेली फाटाफूट आवडलेली नाही, असंच यामधून सूचित होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या