Bidri Sakhar Karkhana Nikal Live : "एवाय साहेब राजकारणात कोणी संपत नाही, पण तुम्हाला गाव सोडायला लावणार हे मात्र नक्की"
Bidri Sakhar Karkhana Nikal Live : कारखान्यासाठी सभासदांनी मतदान करतानाच सत्ताधारी आणि विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. यामध्येही सभासदांच्या रडारवर मेव्हणे पाव्हणे आहेत.
कोल्हापूर : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री साखर कारखान्याची (Bidri Sakhar Karkhana Result) मतमोजणी सुरु असून सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी गटालाच मतदारांनी कौल दिल्याचे दिसून येत आहे. कारखान्यासाठी सभासदांनी मतदान करतानाच सत्ताधारी आणि विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. यामध्येही सभासदांच्या रडारवर मेव्हणे पाव्हणे आहेत. मतपत्रिका एकत्र करताना सभासदांनी मतपेटीत टाकलेल्या अनेक चिठ्ठ्या मिळाल्या. यामध्ये सत्ताधारी गटाचे नेते के. पी. पाटील यांना कानपिचक्या दिल्या आहेत. कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना देव माफ करणार नाही, अशा आशयाच्या चिठ्ठ्या मिळाल्या आहेत.
के. पी. पाटलांना उद्देशून काय म्हटलं आहे चिट्टीत?
के. पी. सायबा, तुम्ही हजारो रोजंदारीच्या जीवाशी खेळलात, त्यांचे करिअर उद्ध्वस्त केले. याला देवही माफ करणार नाही.
पोरांना दिवाळीला 1 साबण जरी दिला असता, तर त्यांनी तुमचे आभार मानले असते
तुमचा संपूर्ण कारखाना टेंपररी सांभाळला आणि तुम्ही त्यांच्या तोंडाला पाने पुसता. पर्मनंटना 28 चा 30 टक्के बोनस करतात. परंतु, टेंपररी सिव्हिलच्या पोरांना दिवाळीला 1 साबण जरी दिला असता, तर त्यांनी तुमचे आभार मानले असते.
ए. वाय. पाटील यांना उद्देशून काय म्हटलं आहे?
एवाय साहेब राजकारणात कोणी संपत नाही, पण तुम्हाला गाव सोडायला लावणार हे मात्र नक्की - सभासद सोळांकूर
दुसरीकडे, मागील बिद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहिलेल्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी त्यांचेच नात्याने मेहुणे असलेल्या के. पी. पाटील यांची साथ सोडत बंडाळी केली आहे. राधानगरी तालुक्यातील जागांवरून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. यानंतर त्यांनी प्रकाश आबिटकर यांच्या परिवर्तन आघाडीला साथ दिली.
बिद्री कारखान्याच्या निमित्ताने के. पी. पाटील आणि ए .वाय. पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करूनही त्यांच्यातील संघर्ष मिटण्याचे नाव घेत नसताना ए. वाय. पाटील यांनी के. पी पाटील यांना धक्का दिला. ए. वाय. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या छावणीत जाऊन के. पी. पाटील यांना टक्कर दिली आहे. खासदार संजय मंडलिक, भाजपचे नेते समरजिंतसिंह घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर व ए. वाय. पाटील विरुद्ध माजी आमदार के. पी. पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यात बिद्रीचे राजकारण पेटलं आहे.
मध्यस्थीनंतरही मुश्रीफांना अपयश
बिद्रीच्या राजकारणात के.पी विरुद्ध ए.वाय असा राजकीय संघर्ष विकोपाला गेल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यावर तोडगा काढण्याची आश्वासन दिले होते. केपी आणि ए. वाय. हे दोघे एकच असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी खुल्या व्यासपीठावर सांगितले होते. मात्र ए. वाय. पाटील यांनी थेट मुश्रीफ यांच्या जवळ जाऊन आपल्यावर होत असलेला अन्यायाचा पाडा वाचून दाखवला. राधानगरी तालुक्यातील संचालक मंडळाच्या सर्व सहा जागांची आणि बिद्रीचे अध्यक्षपद यावर तोडगा निघत नसल्याने माझे आपल्याशी जमत नसल्याचा निरोप मंत्री मुश्रीफ यांना दिला.
इतर महत्वाच्या बातम्या