Kolhapur News: जलप्रदुषणामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी, मनसेकडून माशांचं पिंडदान, अधिकाऱ्यांना इशारा
Water Pollution: शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. शिवाय नदीपात्रात दुर्गंधीयुक्त आणि रसायन युक्त पाणी मिसळल्यामुळे मासे गुदमरून मरत आहेत.
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ भागात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात मृत माशांचा खच दिसून येत आहे. मृत्युमुखी पडलेल्या माशांमुळे (Fish Died) या परिसरात दुर्गंधी पसरली असून याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. मात्र, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीचा विळखा पडला आहे. ही जलपर्णी काढण्यासाठी प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नाही. शिवाय नदीपात्रात दुर्गंधीयुक्त आणि रसायन युक्त पाणी मिसळल्यामुळे मासे गुदमरून मरत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे हेच मासे मच्छीमार पकडत असून ते विक्रीसाठी नेल्याचा संशय नागरिकांना आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ या सगळ्यावर कधी कारवाई करते, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
मनसेकडून मृत माशांचे पिंडदान
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीतील मृत माशांचे पाप इचलकरंजीकरांना लागू नये म्हणून मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. इचलकरंजी इथं पंचगंगा नदी घाटावर माशांचे पिंडदान केले. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रशासनाला जागे करण्यासाठी हे अनोखे आंदोलन मनसेनं केलं आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न न करता अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत. त्यामुळे जर पुढच्या काही दिवसात पंचगंगा प्रदूषण मुक्त नाही झाली तर 100 किलो फुलांचा हार अधिकाऱ्यांना घालून सत्कार करणार असल्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
मासे खाण्यासाठी शेवटचे काही दिवस, पण भाव वाढल्याने खवय्यांचा हिरमोड
मासेमारीच्या शेवटच्या दिवसांमध्ये कोकणात माशांचे दर वाढले आहेत. वातावरणात झालेल्या बदलामुळे सध्या बोटी खोल समुद्रात जात नाहीत. त्यामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. परिणामी माशांच्या दरात वाढ झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. कोकणात मागच्या काही दिवसांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. वातावरणात झालेल्या या बदलामुळे सध्या मासेमारी देखील कमी होत आहे. 1 जूनपासून तांत्रिक पद्धतीनं केली जाणारी मासेमारी नारळी पौर्णिमेपर्यंत बंद असणार आहे. अशावेळी शेवटच्या हंगामात ताजे - फडफडीत मासे खाण्यासाठी खवय्यांची पसंती असते. पण, वधारलेले दर मात्र काही प्रमाणात का असेनात हिरमोड करत आहेत.
माशांचे दर
बांगडा - 200 रूपये किलो
सुरमई - 900 ते 1000 रूपये किलो
पापलेट - 1200 रूपये किलो
मांदेली - 180 ते 200 रूपये किलो
हलवा - 650 ते 750 रूपये किलो
कोळंबी - 500 ते 550 रूपये किलो
आणखी वाचा