(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा; माजी खासदार विनायक राऊत काय म्हणाले?
Kolhapur Uttar Vidhan Sabha : पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर कोल्हापूर उत्तर आपल्याकडेच घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील, असे आश्वासन माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले.
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. मशाल चिन्ह घरोघरी पोहण्यासाठी कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून भव्य मशाल प्रज्वलित करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कोल्हापुरात मिरजकर तिकटीला मशाल प्रज्वलित करून आगामी काळात कोल्हापुरातील एक लाख घरांमध्ये मशाल चिन्हांची पत्रके पोहोच करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ,कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांच्या हाती महाराष्ट्रात धुरा यावी ही महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना शहरप्रमुख विजय देवणे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे घेण्याची मागणी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपनेते संजय पवार यांनीही कोल्हापूर उत्तर विधानसभा विधान मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला मिळावा, अशी मागणी केली. 2022 मधील पोटनिवडणुकीमध्ये जयश्री जाधव यांच्या विजयामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मोलाचा वाटा असल्याचे संजय पवार म्हणाले. पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर कोल्हापूर उत्तर आपल्याकडेच घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील, असे आश्वासन माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत गद्दारांची फौज आपल्यावर तुटून पडली
यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. राऊत यांनी शिरोळमधून इच्छूक असलेल्या उल्हास पाटील यांचा उद्याचा आमदार असा उल्लेख केला. राऊत म्हणाले की, चोरांनी धनुष्यबाण पळवून नेला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत गद्दारांची फौज आपल्यावर तुटून पडली. शिवसेना ज्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला तेच संपले, शिवसेनेचा भगवा नेहमीच फडकत राहिला.
ते पुढे म्हणाले की, पीएम मोदी शाह किती गद्दार आले, तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय राहणार नाही कितीही आदळाआपट केली तरी. त्यांनी सांगितलं की, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन फार मोठे उपकार केले असं कोणीही समजू नये. मराठी भाषेला न्याय देण्यासाठी दहा वर्षे लढा दिला. मराठी भाषेला न्याय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्रासह भारत देशातील मराठी जनतेने केला आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसताना शिंदे गट लुटायला बसला आहे. अत्याचार करणाऱ्यांना मोदींकडून उमेदवारी दिली जात आहे, हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. या भ्रष्टाचार राजवटीचे थोडे दिवस राहिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या