A. Y. Patil : कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार गटाला एकाच आठवड्यात दुसरा धक्का; ए वाय पाटील सुद्धा महाविकास आघाडीच्या वाटेवर
विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाईल, याबाबत स्पष्टता नसली, तरी ए. वाय. पाटील यांनी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु केले आहेत.
कोल्हापूर : माजी आमदार के. पी. पाटील अजित पवार गटातून महाविकास आघाडीच्या वाटेवर असतानाच आता एक आठवड्यामध्येच दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दणका बसलेल्या अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के सुरु आहेत. ए. वाय. पाटील यांनी कार्यकर्त्याना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळेल
विधानसभेला महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळेल, कार्यकर्त्यांनो कामाला लागा, अशा शब्दात ए. वाय. पाटील भूमिका स्पष्ट केली आहे. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील यांनी निवडणुकीसाठी रणशिंग फूंकले आहे.
के. पी. पाटील यांनीही महाविकास आघाडीसाठी रणशिंग फुंकले
विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून कोणता मतदारसंघ कोणाच्या वाटेला जाईल, याबाबत स्पष्टता नसली, तरी ए. वाय. पाटील यांनी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे मेहुणे माजी आमदार के. पी. पाटील यांनीही महाविकास आघाडीसाठी रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे दोघेही काँग्रेसकडून इच्छूक आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी शड्डू ठोकला असला, तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचा सतेज पाटील यांच्या भूमिकेवर अवलंबून असेल.
ए वाय पाटील आणि के पी पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर
राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात दोघांपैकी एकजण असेल, असे बोलले जात आहे. मात्र, मेहुणे पावणे असूनही ए वाय पाटील आणि के पी पाटील यांच्यामध्ये राजकीय वैर आहे. त्यामुळे कोण कोणासाठी डोकेदुखी ठरणार? याचे उत्तर निवडणुकीमध्येच मिळणार आहे.
कोल्हापुरात अजित पवार गट बॅकफूटवर
कोल्हापुरात अजित पवार गटाचे नेतृत्व कोल्हापूरचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खांद्यावर आहे. मात्र, मुश्रीफ यांना कागल आणि चंदगड सोडून पक्ष म्हणावा तसा वाढवता आलेला नाही. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यामधील वाद दूर करण्यामध्येही त्यांना यश आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही नेते एकमेकांचे मतभेद असूनही महाविकास आघाडीत जाण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे पक्षाला जबर फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हे आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या