(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News: कृष्णा नदीत सोडण्यात आलेल्या मळीमिश्रीत पाण्याने मगरीच्या पिलांची दमछाक
Sangli News: मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. यातील एक मगरीचे पिल्लू, तर मळीच्या फेसात अत्यंत अत्यवस्थ असल्याचे काही प्राणिमात्रांना दिसून आले.
Sangli News: सांगलीत कृष्णा नदीत सोडण्यात आलेल्या मळीमिश्रीत पाण्याने मगरीच्या पिलांची दमछाक होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर येथे नदी पात्रात दोन दिवसांपूर्वी मळीमिश्रीत पाणी सोडल्याचे दिसून आले होते. आता या मळीमिश्रीत पाण्यामुळे नदीतील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. यामुळं नदीतील मगरीची पिल्लंही पाण्याबाहेर पडताना दिसत आहेत. यातील एक मगरीचे पिल्लू, तर मळीच्या फेसात अत्यंत अत्यावस्थ असल्याचे काही प्राणिमात्रांना दिसून आले. यातून मळीमिश्रीत पाण्यामुळे मगरीच्या पिल्लांचाही जीव धोक्यात आल्याचे पहायला मिळत आहे.
साखर कारखान्यांनी पाण्यात मळी सोडल्याने शनिवारपासून (8 जुलै) नदीकाठावर फेस जमा झाल्याचे पहायला मिळत होते. प्रदुषित पाण्यामुळे मगरींच्या पिलांची घालमेल सुरु झाली असून अस्तित्वासाठी काठावर आलेली पिले घारीचे लक्ष बनत आहेत. पलूस तालुक्यातील आमणापूर येथील ग्रामस्थांना मगरीची अनेक पिलं जागोजागी सतत पाणवठ्यावर येऊन बसलेली पहायला मिळत होती. त्यांचा आकार सुमारे अकरा ते बारा इंच होता. या पिलांची प्रदुषित पाण्यामुळे दमछाक झाल्याचे पहायला मिळत होते. या पिल्लांना टिपण्यासाठी चार ब्राह्मणी घारींच्या घिरट्या घिरट्या घालत होत्या. गतवर्षी मळीमिश्रीत पाण्यामुळे जुलैमध्ये लाखो मासे मृत्युमुखी पडले होते. यावर्षी मगरीच्या पिल्लांचा जीवावरही संकट ओढावल्याचे दिसत आहे.
गतवर्षी जुलै महिन्यात मासे तर यंदा मगरींवर संक्रांत आली. दुषित पाण्यामुळे जलचक्र विस्कळीत होत असून, पाणी पिणाऱ्या नागरिकांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु, याबाबत संबंधित कोणीच तोंड उघडायला तयार नाही. नदीत मळीमिश्रित पाणी सोडणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा, अशी संतापजनक मागणी जोर धरत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये, काठावर मगरी मृत होण्याचे प्रकार यापूर्वीही झाले आहेत. मासेही वारंवार मृत होतात नदी प्रदुषणाच्या प्रश्नाकडे लक्ष कोण देणार? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरवर्षी कृष्णा नदीला पहिले पाणी आल्यानंतर काही कारखान्याकडून मळीमिश्रित पाणी नदीत सोडले जाते. काही महिन्यांपूर्वी मळीमिश्रित पाणी सोडल्याने अंकली जवळील नदीकाठी मृत माशांचा खच लागला होता. आता पुन्हा मळीमिश्रीत पाणी नदीत सोडले जात असल्याने नदीत केल्या जाणाऱ्या या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा समोर आला असून अशा पध्दतीने नदीत मळीमिश्रीत पाणी सोडणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या