Kolhapur News : कोल्हापुरात कॉमर्स कॉलेजमध्ये 14 मार्चला विभागीय रोजगार मेळावा
या मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 15 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 1500 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्यात असतील.
Kolhapur News : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 14 मार्च रोजी सकाळी 10 वाजता कॉमर्स कॉलेजमध्ये 'विभागीय रोजगार मेळाव्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा जास्तीत-जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उप आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे 15 पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून, त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 1500 पेक्षा जास्त रिक्तपदे या मेळाव्यात असतील. या पदांसाठी किमान 8 वी, 9 वी उत्तीर्णांसह, 10 वी, 12 वी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार पात्र असणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच स्वयंरोजगार करीता विविध महामंडळाकडील शासकीय कर्ज योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.
अल्पमुदत व्यवसाय अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांनी आयटीआयशी संपर्क साधावा
दरम्यान, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत इयत्ता 10 वी, 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पी.एम.के.वाय. 4.0 या योजनेअंतर्गत अल्प मुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम मोफत सुरु करण्यात येत आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 15 मार्च 2023 पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
सीएनसी ऑपरेटर टर्निंग-30, सीएनसी ऑपरेटर व्हर्टिकल मशिनिंग सेंटर-30, ब्युटी थेरपिस्ट (फक्त मुलींसाठी)-20, असिंस्टंट प्लंबर जनरल-20, वेल्डर (GTAW)-30, असिस्टंट इलेक्ट्रिशियन-30, ड्रॉफ्टस्मन मेकॅनिकल-20, फोर व्हिलर सर्व्हिस टेक्निशियन-30 व फिल्ड टेक्निशियन एअर कंन्डिशनर-30 याप्रमाणे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे गुणपत्रक, आधारकार्ड सहित संस्थेत संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी समन्वयक ए.ए.शिंदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या