Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या आखाड्यात दोस्तीत कुस्ती, कोल्हापुरात संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत
Rajya Sabha Election 2022 : शिवसेनेने संजय पवार आणि भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्याने कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये लढत होणार आहे. हे दोघेही महाविद्यालयीन वयापासून मित्र आहेत.
![Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या आखाड्यात दोस्तीत कुस्ती, कोल्हापुरात संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत Rajya Sabha elections 2022 Fight between Shiv Sena's Sanjay Pawar and BJP's Dhananjay Mahadik in Kolhapur Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या आखाड्यात दोस्तीत कुस्ती, कोल्हापुरात संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/30/dace382dba93d098ad30db164f1d3e7a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : भाजपने राज्यसभेसाठी धनंजय महाडिक यांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिल्याने कोल्हापूरला तिसरा खासदार मिळणार हे नक्की झालं आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राज्यसभेवर शिवसेनेचा संजय आणि भाजपचा धनंजय याची जोरदार चर्चा कोल्हापूरमध्ये सुरु झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने धनंजय महाडिक यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये लढत होणार आहे. संजय पवार आणि धनंजय महाडिक हे महाविद्यालयीन वयापासून एकमेकांचे मित्र आहेत. मात्र आता राज्यसभेच्या आखाड्यात दोस्तीत कुस्ती होणार हे नक्की आहे.
महाडिक कुटुंबीयांना राजकीय वारसा खूप मोठा आहे तर गेले तीस वर्ष शिवसैनिक म्हणून रस्त्यावरची लढाई संजय पवार लढत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच कोल्हापूर हे केंद्रस्थाने राहिले आहे. 42 मतांसाठी अजूनही भाजपला 12 मतांची गरज आहे मात्र तरी देखील विजय आपलाच होईल असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी आपला सहावा उमेदवार मागे घेतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. असे असले तरी निर्णयाच्या बाबतीत महाविकास आघाडी आता खूप पुढे निघून गेली आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी लढत होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळेच कोल्हापुरातून राज्यसभेवर संजय की धनंजय ही चर्चा सुरु झाली आहे.
कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
कोण आहेत धनंजय महाडिक?
धनंजय महाडिक हे एकेकाळचे काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुतणे आहेत. महादेवराव महाडिक यांचा त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व होतं. त्याचा फायदा धनंजय महाडिकांना झाला आणि महाविद्यालयीन वयापासूनच ते सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. धनंजय महाडिक यांनी युवा शक्तीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन केलं. त्या माध्यमातून जिल्हाभर त्यांनी युवकांचे जाळे उभारले. 2004 साली धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून लोकसभा लढले होते. पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून त्यांना केवळ 12 हजारांनी पराभर पत्करावा लागला. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी आपले सामाजिक आणि राजकीय कार्य सुरूच ठेवलं. धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2014 साली देशभरात मोदी लाट असताना देखील धनंजय महाडिक खासदार म्हणून लोकसभेत पोहोचले. पण खासदार झाल्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी काही पटलं नाही. दरम्यानच्या काळात ते मुंबई-दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राहणारे धनंजय महाडिक हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मात्र भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्यासोबत जुळवून घ्यायचे. याचाच फटका त्यांना 2019 सालच्या निवडणुकीत बसला आणि त्यांचा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्याकडून पराभव झाला. 2019 सालच्या निवडणुकीआधीच धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी चंद्रकात पाटील यांनी प्रयत्न केला होता. अखेर तो योग निवडणुकीनंतर जुळून आला आणि धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपने त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)