Rajya Sabha Election 2022 : कोल्हापुरात उत्सुकता शिगेला, संजय पवार बाजी मारणार की महाडिकांना विजयी गुलाल लागणार?
Rajya Sabha Election 2022 : संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही धनंजय महाडिक यांना उमेदवारी देत राज्यसभा निवडणुकीतील चुरस वाढवली.
कोल्हापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू सुरुवातीपासूनच कोल्हापूर जिल्हा राहिला आहे. संभाजीराजेंनी शिवसेनेकडून शिवबंधन नाकारल्यानंतर संजय पवारांच्या (Sanjay Pawar) गळ्यात उमेदवारीची माळ पडली, तर भाजपनेही राजकीय खेळी करताना धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी देत निवडणुकीतील चुरस वाढवली. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात थेट लढत होणार आहे.
त्यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्राॅस व्होटिंगच्या भीतीने सर्वच पक्षांनी आपल्या आमदारांना सेफ झोनमध्ये ठेवण्यास प्राधान्य दिले आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक (भाजप), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी), संजय राऊत आणि संजय पवार (शिवसेना) आणि इम्रान प्रतापगढी (काँग्रेस) हे उमेदवार सहा जागांसाठी रिंगणात आहेत.
कोणाकडे किती मतं आहेत ?
शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी 53, काँग्रेस 44, भाजप 106, बहुजन विकास आघाडीचे (BVA) तीन, समाजवादी पक्ष, एआयएमआयएम आणि प्रहार जनशक्ती पक्ष प्रत्येकी दोन, मनसे, माकप, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, जनसुराज्य शक्ती पक्ष, क्रांतिकारी शेतकरी पक्ष यांचा प्रत्येकी एक आमदार आणि 13 अपक्ष आमदार आहेत. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजप छोटे पक्ष आणि अपक्ष यांच्या 25 इतर मतांवर विसंबून आहेत.
कोल्हापुरात राजकीय उत्सुकता शिगेला
संभाजीराजेंनी शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्या विजयासाठी शिवेसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ संजय पवार शिवसेनेमध्ये सक्रीय आहेत. दुसरीकडे भाजपने धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवत कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये कुस्ती लावून दिली आहे. जिल्ह्यात महाडिक गटाला विजयाची चव चाखता आलेली नाही. त्यामुळे महाडिक यांनीही विजयासाठी गेल्या काही दिवसांपासून पायाला भिंगरी लावली होती. त्यांचे कट्टर राजकीय विरोधक पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनीही महाडिकांना रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे विजयी गुलाल कोण उधळणार याचे उत्तर आज संध्याकाळी साडे सातपर्यंत मिळेल. मात्र, कुस्ती कोण मारणार ? याची उत्सुकता कोल्हापुरात शिगेला पोहोचली आहे.
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपमध्ये थेट लढत
गुरुवारी सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनिती ठरवण्यात व्यग्र असल्याचे दिसून आले. तब्बल दोन दशकांनंतर महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक होत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये ठेवलं आहे. सत्ताधारी आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान सुरू होण्यापूर्वीच विधानसभेसाठी ते रवाना होतील.
इतर महत्त्वाच्या बातम्या