Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बेळगावमध्ये विराट मोर्चा; ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 400 रुपये देण्याची मागणी
शेतकऱ्यांना प्रतिटन 400 रूपये दुसरा हप्ता, वजनकाटे ऑनलाईन व महाराष्ट्र सरकारप्रमाणे वाहतूदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला.
बेळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti March in Belgaum) यांच्या नेतृत्वात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेला चांगला दर असल्याने कर्नाटकमधील ऊस उत्पादक (Sugarcane) शेतकऱ्यांना प्रतिटन 400 रूपये दुसरा हप्ता, वजनकाटे ऑनलाईन व महाराष्ट्र सरकारप्रमाणे वाहतूदारांची फसवणूक केलेल्या मुकादमांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह धडक मोर्चा काढण्यात आला.
निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी
कर्नाटक सरकारने (Karnataka) राज्यातील सर्व कारखान्यांचा हिशोब तातडीने पूर्ण करून सरकारकडून एफआरपी अधिक जादाची रक्कम देवूनच गळीत हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे कर्नाटकचे साखरमंत्री शिवानंद पाटील यांनी सांगितले. शिवानंद पाटील यांनी कर्नाटक राज्यातील ऊस उत्पादक व वाहतूकदाराच्या प्रश्नाबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावून तोडगा काढण्याबाबत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षभरात साखरेला व ऊप पदार्थाला चांगला दर मिळाला असल्याचे सांगितले. कर्नाटक सरकारने गेल्यावर्षी इथेनॅाल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन 150 रूपये व इतर कारखान्यांनी प्रतिटन 100 रूपये एफआरपीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.
राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन
कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांमध्ये काटामारीचे प्रमाण जास्त असून राज्यातील साखर कारखान्याचे वजनकाटे ॲानलाईन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याबरोबरच कर्नाटक राज्यातील ऊस तोडणी मजूर मुकादमांनीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केले असून कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारने ज्यापध्दतीने नोडल ऑफिसर म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून तातडीने संबधित फसवणूक केलेल्या मुकादमावर गुन्हे दाखल करणेबाबत पोलिस प्रशासनाला आदेश देण्याची मागणी केली. मंत्री शिवांनद पाटील यांनी शिष्टमंडळासोबत वरील मागण्याबाबत ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूकदारांसोबत सकारात्मक चर्चा करत राज्य सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्यान्नावर, संदीप राजोबा, सुरेश चौगुले, तात्या बसण्णावर, गणेश इळेगेर, बाबूराव पाटील यांचेसह चिकोडी, रायबाग, बेळगाव, विजापूर, बागलकोट या जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या