Deepak Kesarkar : बाळासाहेबांचा वारसा गेला, आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे, उद्धव ठाकरे स्वतः मिंधे; दीपक केसरकरांचा हल्लाबोल
शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत. हिंदुत्वापासून दूर व्हा हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं नाही, अशी टीका शालेय शिक्षमंत्री दीपक केसरकर यांनी केली.
Deepak Kesarkar : शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काहीही करू शकत नाहीत. हिंदुत्वापासून दूर व्हा हे कधीही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सांगितलं नाही, अशी टीका शालेय शिक्षमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. दीपक केसरकर पुढे म्हणाले, की "बाळासाहेब यांचा वारसा गेला आहे. आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहेत हे पाहायला मिळत आहे. शक्तिप्रदर्शन केल्याशिवाय आता उद्धव ठाकरे काहीही करू शकत नाहीत. हिंदुत्वापासून दूर व्हा हे कधीही बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही सांगितलं नाही, सेना आणि भाजपची युती ही बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आहे". दरम्यान, आरोप करताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संयम बाळगला पाहिजे. कारण ते स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत ते त्यांनी थांबवावं, अशी टीकाही त्यांनी केली.
केसरकर यांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलण्यास बगल दिली. मात्र, त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई यांच्याबद्दल कधीही वाईट बोलणार नसल्याचे ते म्हणाले.
शाहू स्टेडियमवर पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
दरम्यान, कोल्हापूर हा महाराष्ट्रातील आणि देशातील पहिला जिल्हा होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, कोल्हापूरचं वैभव वाढलं पाहिजे त्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शाहू स्टेडियममध्ये आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री दीपक केसरकर मार्गदर्शन करत होते. त्यांनी आपल्या भाषणातून कोल्हापूरच्या विकासकामांचा आढावा घेतला. राज्यातील 50 शाळांच्या विकासात कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूलचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पंचगंगा प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात सुविधा देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे, कोल्हापूरचं वैभव वाढलं पाहिजे त्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, कोल्हापूर शहरातील रस्त्यांची महापूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून रस्ते दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाला तत्काळ 10 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता. संपूर्ण शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व काही ठिकाणी नवीन रस्त्यांसाठी मुख्यमंत्री महोदय यांनी विशेष बाब म्हणून 70 कोटीचा निधी मंजूर केला आहे. यामुळे नागरिकांना चांगले व उत्कृष्ट रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध होतील.
अमृत-2 योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरामध्ये दुसऱ्या टप्यात 344 कोटीचा प्रस्ताव ड्रेनेज लाईन, रंकाळा आणि लक्षतीर्थ तलाव पुर्नजिवित व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी मिळून कामांना सुरुवात होणार आहे. कोल्हापूर शहरात दिव्यांग नागरिकांसाठी "राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियान" राबविण्यात आले. यावर्षी महापालिकेने दिव्यांगासाठी साडेसहा कोटीचा निधी राखीव ठेवला आहे, अशी माहिती पालकमंत्री केसरकर यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या