Deepak Kesarkar on kolhapur Dasara : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश विदेशात पोहचवूया, पालकमंत्री दीपक केसरकरांचे प्रतिपादन
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाने लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया, असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले.
Deepak Kesarkar on kolhapur Dasara : कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव हा येथील राजघराण्याच्या मान्यतेने शासन सहभागाबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, लोकसहभागातून विविध उपक्रमांनी भव्य दिव्य पध्दतीने साजरा करत देश विदेशात पोहचवूया, असे आवाहन पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केले.
दसरा महोत्सवाबाबत शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, समरजितसिंह घाटगे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव भव्य सोहळा (ग्रँड इव्हेंट) म्हणून साजरा करुन देश विदेशात पोहोचण्यासाठी प्रयत्न करुया, असे सांगून, या महोत्सवासाठी शासनाच्यावतीने २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
पालकमंत्री दिपक केसरकर म्हणाले, शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी कमी कालावधी असला तरी देखील विविध उपक्रमांची व्यापक प्रसिध्दी व सुयोग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शाही दसरा महोत्सव हे देशातील एक आकर्षण ठरुन देश विदेशातील नागरिकांनी या शाही दसरा महोत्सवाला भेट द्यावी, अशा पध्दतीने हा महोत्सव साजरा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुया. या महोत्सवात अधिकाधिक नागरिक व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी न्यू पॅलेस ते दसरा चौक व भवानी मंडप ते दसरा चौक मार्गांवर कार्यक्रम आयोजित करावेत.
या मार्गांचे सुशोभिकरण, विविध पारंपरिक कला व क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करावे, असे सांगून दसरा महोत्सव साजरा करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री श्री. केसरकर यांनी सविस्तर चर्चा केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व खासदार धैर्यशील माने यांनी दसरा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी आवश्यक विविध उपक्रमांबाबत चर्चा केली.
शाही दसरा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा होण्यासाठी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाबाबत तसेच समाजातील सर्व घटकांच्या सहभागासाठीचे नियोजन, विविध सांस्कृतिक व अन्य उपक्रमांची रुपरेषा, महोत्सवाची व्यापक प्रसिध्दी, आकर्षक विद्युत रोषणाई, ऐतिहासिक ठिकाणांचे व मिरवणूक मार्गांचे सुशोभिकरण, नागरिक व पर्यटकांसाठी विविध सोयी सुविधा आदींबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या