Gokul : ठाकरे-शिंदे वादात आता निष्ठावंत शिवसैनिकांची सुद्धा फरफट! कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द
Gokul : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.
![Gokul : ठाकरे-शिंदे वादात आता निष्ठावंत शिवसैनिकांची सुद्धा फरफट! कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द Loyal Shiv Sainiks are suffer in the Thackeray-Shinde dispute Muralidhar Jadhav appointment in Gokul is cancelled Gokul : ठाकरे-शिंदे वादात आता निष्ठावंत शिवसैनिकांची सुद्धा फरफट! कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची गोकुळमधील नियुक्ती रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/02/155d3880c038fe7173b461697f51b4a4166468855395688_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gokul : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानतंर फुटीर गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष दिवसागणिक तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटांची न्यायालयीन लढा सुरु असताना आता त्याचा फटका ज्यांच्या जीवावर नेते मोठे झाले त्या निष्ठावंत शिवसैनिकांना सुद्धा बसू लागला आहे. याची प्रचिती कोल्हापूरमध्ये आली आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गोकुळला आदेश प्राप्त झाला आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.
नियुक्ती झाल्यानंतरही मुरलीधर जाधव यांचा संघर्ष
गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी झाल्यानंतर मुरलीधर जाधव यांना सहज प्रवेश गोकुळमध्ये झाला नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन करून हसन मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली होती. शासन नियुक्त प्रतिनिधीला संचालक मंडळाने ठराव संमत करून सरकारकडे द्यावा लागतो. मात्र, त्यामध्ये गोकुळकडून तीन महिने दिरंगाई झाल्याने मुरलीधर जाधव यांनी आंदोलन केले होते.
त्यानंतर अलीकडेच शासन नियुक्त मुरलीधर जाधव यांच्यासह दोन स्वीकृत संचालक म्हणून युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुरलीधर जाधव यांच्या पाठिशी ठाम राहिल्याने गोकुळमधील सत्ताधाऱ्यांना नमते घ्यावे लागले होते. त्यामुळेच मुरलीधर जाधव यांचा गोकुळमधील प्रवेश सुकर झाला होता. मात्र, सत्तांतर झाल्याने आता परिस्थिती बदलली आहे.
आता कोणाला संधी मिळणार?
शिवसेनेत 40 आमदारांनी बंड केल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यामध्येही उमटले. जिल्ह्यातून आमदार प्रकाश आबिटकर,माजी आमदार राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी शिंदे गटाशी घरोबा केला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सत्ताधारी शिंदे गटात आणि निष्ठावंत शिवसैनिक दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती आहे. बंडखोरांविरोधात कोल्हापूरमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी मोर्चे काढून त्यांना जाबही विचारला होता. यामध्ये मुरलीधर जाधवही आघाडीवर होते. कोल्हापूर शहरातही शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर आणि शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. इंगवले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीमध्ये बंडखोर खासदार संजय मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता राजकीय समीकरणे बदलल्याने शिंदे गटातील एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या पदासाठी संजय मंडलिक वीरेंद्र यांच्यासाठी तसेच राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर आपल्या मुलासाठी तसेच विद्यमान आमदार म्हणून प्रकाश आबिटकरही ताकद लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूरमधील शिंदे गटाचे नेतृत्व राजेश क्षीरसागर करत आहेत. त्यामुळे गोकुळमधील शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून कोणाची वर्णी लागते हे लवकरच समजेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)