Ambabai Mandir Navratri : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भक्ती आणि गर्दीचा महापूर; दोन दिवसांत साडे आठ लाखांवर भाविकांकडून दर्शन
साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी भाविकांच्या गर्दीने विक्रम मोडित काढला. त्यामुळे प्रशासनाकडून 12 ठिकाणांवर पार्किंगची व्यवस्था करूनही तोकडी पडली.
Ambabai Mandir Navratri : साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी भाविकांच्या गर्दीने विक्रम मोडित काढला. त्यामुळे प्रशासनाकडून 12 ठिकाणांवर पार्किंगची व्यवस्था करूनही तोकडी पडली. त्यामुळे कोल्हापूर शहरातील वाहतुकीवर विपरित परिणाम झाल्याचे दिसून आले. शनिवारी तब्बल 4 लाख 87 हजार 521 भाविकांनी दर्शन घेतले. शुक्रवारी 3 लाख 22 हजार 425 भाविकांनी दर्शन घेतले होते. त्यामुळे फक्त दोन दिवसांमध्येच साडे आठ लाखांवर भाविकांनी मंदिराला भेट दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती चे सचिव शिवराज नायकवडे म्हणाले, शुक्रवार आणि शनिवार मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता आणि दर्शनाची रांग भवानी मंडप परिसरात पसरली होती. रविवारी विक्रमी गर्दी अपेक्षित आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ हाताळण्यासाठी देवस्थान समितीकडून सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
शनिवारी, नवरात्राच्या सहाव्या दिवशी, देवी महालक्ष्मीची मूर्ती भक्ती-मुक्ती प्रदायिनी रूपात पूजा बांधण्यात आली होती. ज्यामध्ये राजा सुरथ आणि समाधी वैश्य यांना देवीची पूजा करताना दाखवण्यात आले होते. गजानन मुनीश्वर आणि श्रीनिवास जोशी यांनी पूजा बांधली होती.
भारत भूमीमध्ये अनेक तीर्थ आहेत. कित्येक तीर्थ भुक्ती म्हणजे आयुष्याची सर्व सुखं देतात, भोग देतात तर काही तीर्थ ही मुक्ती देतात पण करवीर हे एकमात्र असे तीर्थ आहे जी भुक्ती आणि मुक्ती दोन्ही देतं. भुक्ती अर्थात जगण्याची सर्व सुखं आणि मुक्ती अर्थात पुन्हा जन्म मरणाचा फेरा न पाहण्याचं शाश्वत वरदान. करवीर क्षेत्री या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते. कारण हे क्षेत्र या मोठ्या आईचं अर्थात महामातृकक्षेत्र म्हणून ओळखलं जातं.
याच रूपात सहाव्या माळेला करवीर निवासिनीची पूजा साकारण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या