Kolhapur News : पंचगंगा आणि भोगावती नदीच्या काठावर दोन दिवस उपसाबंदीचे आदेश
पंचगंगा (Panchganga River) व भोगावती नद्यांच्या (Bhogavati River) दोन्ही काठावर 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान दोन दिवस उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्या नद्यांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे विभागाकडून पुन्हा उपसाबंदीचा आदेश देण्यात आला आहे. पंचगंगा (Panchganga River) व भोगावती नद्यांच्या (Bhogavati River) दोन्ही काठावर 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान दोन दिवस उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले आहेत. राधानगरी धरणाच्या पाण्यावर असणाऱ्या भोगावती नदी ते शिंगणापूर दरम्यान उपसाबंदी असणार आहे. राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही काठावर ही बंदी लागू आहे.
तुळशी धरणापासून ते बीड कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतचा भाग, कुंभी धरणापासून भोगावती नदी संगमापर्यंतचा भाग, कासारी धरणापासून प्रयाग चिखली संगमापर्यंतचा भाग, नमूद केलेल्या नदीवरील भागात मिळणाऱ्या सर्व ओढ्या आणि नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही काठावर पाणी उपसाबंदी असेल. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर ते शिरोळ इचलकरंजी दरम्यान कार्यवाहीचा भागामध्ये शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपसायंत्रासाठी 30 एप्रिल ते 1 मे 2023 असे दोन दिवस उपसाबंदी केली जाईल. उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना एका वर्षाच्या कालावधीसाठी रद्द केला जाईल, असेही बांदिवडेकर यांनी आदेशात म्हटले आहे.
दूधगंगा उजवा मुख्य कालव्यावरही बंदी
दूधगंगा उजवा मुख्य कालव्याच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये तसेच दूधगंगा नदी व कालवा भागात मिळणाऱ्या सर्व ओढे व नाल्यावरील पाणी फुगीच्या दोन्ही तीरावरील भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी केली आहे. यासाठी, दूधगंगा नदी (धरणस्थळ ते दत्तवाड को.प.बंधारा), दूधगंगा उजवा मुख्य कालवा (लिंगाचीवाडी ते बिद्री कालवा दुभाजक)आणि दूधगंगा डावा कालवा (धरण ते पिंपळगावख ता. कागल) या ठिकाणीही 30 एप्रिल ते 1 मे असे 2 दिवस उपसाबंदी असेल.
कोल्हापूर शहराला पंचगंगा आणि भोगावती नदीतून पाणी उपसा केला जातो. मात्र, याच दोन्ही नद्यांनी तळ गाठल्याने उपसा होण्यावर विपरित परिणाम झाला आहे. उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने शहरातील पाणीपुरवठा गंभीर झाला आहे. थेट पाईपलाईन पाणी योजना अजूनही पूर्णत्वास गेलेली नाही. त्यामुळे शहरवासियांची भर उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु आहे. दुसरीकडे, कुंभी नदीने सुद्धा तळ गाठला आहे. कोल्हापूर शहरासाठी भोगावती नदीतून पाणी उपसा करण्यासाठी बालिंगा केंद्रात चार आणि नागदेववाडी केंद्रात दोन उपसा पंप आहेत. मात्र, नदीने तळ गाठल्याने उपसा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु केल्यानंतर पाणी सोडण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या