Shivaji University: शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला मिळाले नवीन पाहुणे; 29 मार्चला होणार सोहळा
Shivaji University: विद्यापीठाचा 59 वा दीक्षांत समारंभ 29 मार्चला घेण्यास राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे समारंभाच्या तयारीसाठी वेग घेतला आहे.
Shivaji University : प्रलंबित असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) दिक्षांत समारंभाला राज्यपालांनी मान्यता दिल्यानंतर कार्यक्रमासाठी नवे पाहुणे मिळाले आहेत. आता या समारंभासाठी आयआयटी कानपूरचे माजी संचालक आणि पद्मश्री संजय धांडे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतील. विद्यापीठाचा 59वा दीक्षांत समारंभ 29 मार्चला घेण्यास राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. धांडे यांनी उपस्थितीसाठी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला होकार कळवला आहे. त्यामुळे समारंभाच्या तयारीसाठी वेग घेतला आहे.
यापूर्वी, विद्यापीठाने 16 फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निमंत्रित केल्यानंतर कोल्हापुरातून शिवसेना ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतर कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर दीक्षांत समारंभ स्थगित करण्याचा निर्णय विद्यापीठाने 13 फेब्रुवारीला जाहीर केला. त्यानंतर दीक्षांत समारंभ 29 मार्चला घेण्यास नवे राज्यपाल बैस यांनी मान्यता दिली. त्यानंतर यापूर्वी निमंत्रित करण्यात आलेल्या डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनाही विद्यापीठ प्रशासनाने नव्याने कळवले होते. मात्र, पूर्वनियोजित इतर कार्यक्रमामुळे समारंभाला उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कळविले.
त्यानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून नवे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री संजय धांडे यांना निमंत्रण दिले होते. त्यांनी होकार दिला आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक म्हणून ते परिचित आहेत. त्यांनी पंतप्रधानांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सदस्य म्हणून काम केले आहे. पुणे आणि कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स फॉर एज्युकेशन अँड रिसर्चसाठी व्हिजन डॉक्युमेंटची निर्मिती करण्यात त्यांनी योगदान दिले आहे. त्यांनी कॉम्प्युटर एडेड डिझाईन, रॅपिड प्रोटोटाइपिंग, रॅपिड टूलिंग आणि रिव्हर्स इंजिनीअरिंग या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. उज्जैन येथील अवंतिका विद्यापीठाच्या कुलपतीपदी ते सध्या कार्यरत आहेत.
दरम्यान, विद्यापीठातील 66 हजार 457 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. या प्रमाणपत्रांची छपाईही पूर्ण झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या