Kolhapur Crime: कोल्हापुरातील कुरिअर व्हॅनला साताऱ्यात अडवून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची लूट
Kolhapur News: चोरट्यांनी गाडीतील सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर संतकुमार आणि गोलू यांना पकडून ठेवलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना सोडून देत पलायन केले.

Kolhapur Crime: कोल्हापुरातील कुरिअर कंपनीच्या व्हॅनला पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीत काशीळजवळ अडवून सोन्या चांदीच्या दागिन्यांची लूट करण्यात आली. रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. लुटारूंनी 110 ग्रॅम सोने व 17 किलो चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत पळवून नेले. या दागिन्यांची किंमत सुमारे 17 लाख 62 हजारांच्या घरात आहे. याप्रकरणी संतकुमार उरणसिंग परमार (वय 25, सध्या रा. भेंडे गल्ली, कोल्हापूर) यांनी 9 अनोळखी चोरट्यांविरोधात साताऱ्यातील बोरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गाडी अडवून तोंडावर स्प्रेचा फवारा मारला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून संतकुमार परमार आणि गोलू दिनेश परमार शनिवारी रात्री 10 वाजता साईनाथ एक्स्प्रेस कुरिअर कंपनीच्या पिकअप व्हॅन (एमएच-40 बीपी-8427) मध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे पार्सल बॉक्स घेऊन पुण्याकडे निघाले होते. त्यांची व्हॅन साताऱ्यामधील काशीळमध्ये चोरट्यांनी कार आडवी मारून जबरदस्तीने थांबवून त्यांनी संतकुमार व गोलू परमार यांच्या तोंडावर स्प्रेचा फवारा मारून दोघांना खाली उतरविले. त्यानंतर पाठीमागून दोन दुचाकींवरून आलेल्या चार व्यक्तींनी संतकुमार व गोलू यांना धरून ठेवले.
फक्त सोन्या-चांदीचे दागिन्यांचे बॉक्स उचलले
चोरट्यांनी गाडीतील सोन्या-चांदीचे दागिने असलेले कुरिअर पार्सल बॉक्स गाडीसह ताब्यात घेतले. त्यानंतर संतकुमार व गोलू यांना पकडून ठेवलेले दुचाकीस्वारांनी त्यांना सोडून देत पलायन केले. त्यानंतर चोरट्यांनी पुढे जाऊन समर्थगावमध्ये गाडीच्या दरवाजाचे कुलूप तोडून फक्त सोन्या-चांदीचे दागिन्यांचे बॉक्स व गाडीची किल्लीसह पसार झाले.
पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
महामार्गावर लुटीची झालेल्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखा, ठसेतज्ज्ञ व श्वानपथकाने काशीळ परिसर पिंजून काढला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही.
कोल्हापुरात चोराचे थैमान
दुसरीकडे, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरांचे थैमान सुरुच आहे. इचलकरंजीमध्ये 25 मे रोजीच्या रात्री चोरांनी अक्षरश: धुमाकूळ घालताना तब्बल आठ बंद फ्लॅटना लक्ष्य करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हौसिंग सोसायटीमधील गाढ झोपेत असतानाच फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. कबनूरमधील सरस्वती हौसिंग सोसायटीमधील तीन फ्लॅटधारकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुमारे 14 तोळे सोन्याचे दागिन्यांसह चांदीचे दागिने, रोख अडीच लाख रुपये असा एकूण 10 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. चोरीच्या गुन्ह्याची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. अन्य फ्लॅटधारक बाहेर असल्याने चोरीतील मुद्देमाल वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग चोऱ्यांचे सत्र सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या






















