एकाच तरुणीचे तब्बल 12 इन्स्टा अकाऊंट काढून अश्लील मेसेज पाठवले; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार
Kolhapur Crime : तरुणीची बदनामी करण्याच्या हेतूने तब्बल 12 इन्स्टा अकाउंट काढून अश्लील मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात (Kolhapur Crime) उघडकीस आला.
Kolhapur Crime : तरुणीची बदनामी करण्याच्या हेतूने तब्बल 12 इन्स्टा अकाऊंट काढून अश्लील मेसेज पाठवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात (Kolhapur Crime) उघडकीस आला. पीडिताने फेसबुक आणि इन्स्टा अकाऊंट बंद करुनही आपल्या नावाचा वापर करुन असा घृणास्पद प्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून सायबर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पीडित तरुणी कोल्हापूर शहराला लागून असलेल्या एका गावामध्ये राहते. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार घडला होता. त्यामुळे तरुणीची बदनामी करण्याच्या हेतूने हा प्रकार झाल्याचे स्पष्ट होत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत असल्याने पोलिसांकडे धाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील एका गावात तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील फोटोंचा वापर करण्यात आला आहे. त्यातून तिच्याच नावाने 12 बनावट इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार करुन अश्लील मेसेज पाठवण्यासाठी केला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये पहिले बनावट अकाऊंट लक्षात आल्यानंतर संबंधित पीडित तरुणीच्या पालकांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संबंधित तरुणीने तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले होते. आता पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत असल्यामुळे त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून अज्ञात व्यक्तीने तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाती तयार करुन अश्लील मेसेज व्हायरल केले आहेत. संबंधित तरुणीचा फोटो माॅर्फ करुन पोस्ट केला आहेत. तसेच अश्लील भाषेत मजकूर दिला आहे.
कोल्हापुरातील तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, विवाहित तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियात व्हायरल केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्येच एक महिन्यापूर्वी घडली होती. त्या तरुणाने संबंधित पीडित विवाहित तरुणीच्या मैत्रिणीच्या नावे फेक इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो व्हायरल केले होते. जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातहा प्रकार घडला होता. या प्रकरणी समाधान खांडेकर (रा. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विवाहित तरुणीचे लग्नापूर्वीचे अश्लील फोटो सोशल मीडियात अपलोड करुन बदनामी केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. संशयित आरोपी आणि संबंधित विवाहित तरुणीची लग्नापूर्वी 2016 मध्ये फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर मैत्री झाली होती. त्यावेळी त्यांचं एका लॉजवरील अश्लील छायाचित्र बोगस इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलं होतं. त्याने हे अकाऊंट विवाहित महिलेच्या मैत्रिणीच्या नावाने काढलं होतं. या अकाऊंटवर फोटो टाकल्यानंतर त्याला विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देत धमकावण्याचाही प्रकार केला. त्यानंतर संबंधित विवाहित तरुणीने पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या