Agriculture News : शेतकऱ्यांची थट्टा लावली राव..! कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो 27 पैसे दर
Bringle Price : कांद्यानंतर आता वांग्याच्या दरामध्येही घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे.
Aubergine Price : कांद्यानंतर आता वांग्याच्या दरामध्येही घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या किंमतीने राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आता वांग्याची किंमतही घसरल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात वांग्याला प्रति किलो फक्त 27 पैसे दर मिळाल्याचं समोर आले आहे. त्यातच अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
जगाचा अन्नदाता म्हणून पाहिला जाणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती घोर निराशा पडली आहे. अवकाळी पावसामुळे हातात तोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. अशातच कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात वांग्याला प्रति किलो केवळ 27 पैसे दर देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यातून शेतकऱ्याचा वाहतूक खर्च देखील निघाला नसून रात्रंदिवस शेतात राबवून शेतकऱ्याच्या हाती अखेर निराशा पडली आहे.
गेला काही दिवसात कांद्याला दर नसल्याने शेतकरी हताश झाला असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवल्याचे आपण पाहिलेय. त्याशिवाय गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हातात तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त केलं. तर भाव मिळत नसल्याने शेतकरी फुकट भाजी वाटल्याची घटना ताजी असताना आता कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातून देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. वांग्याचे दर देखील घसरले असून येथील शेतकऱ्याला प्रति किलो 27 पैसे इतकं नीचांकी दर देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा दर देण्यात आला असून शेतकऱ्याला पिकातून वाहतुकीचा खर्च देखील निघालेल नाहीय. हा आजपर्यंतचा सर्वात निश्चित दर असून जगदाळे कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करतात मात्र आज इतका नीचांकी दर त्यांच्या वांगी पिकाला मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या पदरी घोर निराशा पडली आहे.
जगदाळे यांनी दिनांक 1 मार्च रोजी 237 किलो वांगी त्यांनी वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला पाठवली होती. तर याची एकूण किंमत ही 592 रुपये देण्यात आली यातून भाडे आणि हमाली भत्ता काढून केवळ एकूण 66 रुपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत. एका बाजूला 27 पैसे इतक्या नीचांकी दराने शेतकऱ्याकडून वांगी खरेदी केली जात असून बाजारात मात्र हीच वांगी 30 ते 40 रुपये किलो विकली जात आहे. यामुळे शेतकऱ्याने देखील अनेक सवाल उपस्थित केले आहेत. जो पिकवतो त्याला 27 पैसे आणि ग्राहकाला मात्र 30 ते 40 रुपये किलोने वांगे भेटत असतील तर मधल्या पैशांमधील तफावत ही तपासण्याची गरज असल्याचे जगदाळे यांनी म्हटले आहे.