Kolhapur News: पावसाने लेट केल्यास 'पाणीदार' कोल्हापुरात 'पाणीबाणी' अटळ; जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 16.78 टीएमसी पाणी
Kolhapur News: कोल्हापुरात नद्यांनी तळ गाठला असतानाच धरणामधूनही गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याने धरणांची सुद्धा तीच अवस्था आहे.
Kolhapur News: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मोसमी पावसाने वेळेत आगमन न केल्यास परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे आहेत. पाणीदार जिल्हा ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये आजघडीला प्रमुख आठ धरणांमध्ये 16.78 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे कोल्हापूरवर पाण्याची टांगती तलवार आहे. नद्यांनी तळ गाठला असतानाच धरणामधूनही गेल्या काही दिवसांपासून पाणी सोडण्यात आल्याने धरणांची सुद्धा तीच अवस्था आहे. पाटबंधारे विभागाकडून गेल्या महिनाभरापासून उपसाबंदीच्या माध्यमातून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची स्थिती
जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या राधानगरी धरणात केवळ 1.89 टीएमसी पाणी आहे. गतवर्षी याचवेळी 2.38 टीएमसी पाणी होते. दुधगंगा धरणामध्ये 2.08 टीएमसी पाणी असून गतवर्षी याचवेळी 7.02 टीएमसी पाणी होते. तुळशी धरणामध्ये 1.09 टीएमसी पाणी असून गतवर्षी याचवेळी 1.64 टीएमसी पाणी होते. कासारी धरणामध्ये 0.61 टीएमसी पाणी असून गतवर्षी याचवेळी 0.71 टीएमसी पाणी होते. कुंभी धरणामध्ये 1.13 टीएमसी पाणीसाठा असून गेल्यावर्षी 1.27 टीएमसी पाणीसाठा होता. पाटगाव धरणात 0.92 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी 1.34 टीएमसी होते. कडवी धरणात 0.90 पाणी असून गेल्यावर्षी 0.78 टीएमसी होते. वारणा धरणात 8.16 टीएमसी पाणी असून गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये 5.62 टीएमसी होते.
उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांनी तळ गाठणे नवीन नसले, तरी धरणामधील पाणी असल्याने चिंता करण्यासारखी परिस्थिती नव्हती. यंदा मात्र, या सर्वांना अपवाद झाला असून धरणांची स्थिती सुद्धा चिंताजनक आहे. त्यामुळे मोसमी वेळेत आगमन न केल्यास परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते. मे महिन्याचा अखेर येऊनही धरणातील पाण्याचा शेतीसाठी उपसा सुरु आहे. दुसरीकडे, शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी नऊ फुटांवर आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यावर मर्यादा आल्याने नदीकाठच्या गावांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. अवकाळी पावसाने जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तरी तापमानामुळे नद्यांच्या पाणी पातळीवर फारसा फरक पडलेला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या