Kolhapur Crime: पन्हाळगडावरील ऐतिहासिक तानपीर मजारीची समाजकंटकांकडून नासधूस; हिंदू-मुस्लिम बांधवांनी पुन्हा बांधत दिला ऐक्याचा संदेश
Kolhapur News: काही दिवसांपूर्वी या मजारीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. त्यानंतर मजारीची अज्ञात समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आली. सध्या पन्हाळगडावर शांतता आहे.
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पन्हाळगडावरील (Panhala) ऐतिहासिक तानपीर मजारीची अज्ञात समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आली होती. त्याच मजारीची सर्वधर्मियांनी एकत्र येत पुन्हा डागडूजी करत धार्मिक ऐक्याचा संदेश देत समाजकंटकांना चपराख दिली आहे. या पार्श्वभूमीवर किल्ले पन्हाळगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या मजारीबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. त्यानंतर रात्री मजारीची अज्ञात समाजकंटकांकडून नासधूस करण्यात आली होती. पन्हाळगडावर पर्यटकांना प्रवेश दिला जात नसून संपूर्ण प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा पर्यटकांना गडावर सोडलं जाणार आहे. त्यामुळे सध्या पन्हाळगडावर शांतता आहे.
सोशल मीडियावर आठवडाभर पोस्ट व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर किल्ले पन्हाळगडावर अचानक नव्या दर्ग्याचे बांधकाम होत असल्याचा चुकीचा संदेश सोशल मीडियातून व्हायरल होत होता. त्यामुळे शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या दर्ग्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्नही समाजकंटकांकडून सुरू होता. या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून या दर्ग्यात येऊन मजारीची मोडतोड करण्यात आली. ही घटना लक्षात येताच तातडीने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बातमी सर्वत्र पसरल्यानंतर परिसरातील हिंदू मुस्लिम बांधव एकत्र आले आणि त्यांनी मजार दुरुस्ती करून तासाभरात तुरबती पुरवत केल्या.
पन्हाळा पोलिसांकडून नाकाबंदी
जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रमेश शेंडगे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई या सकाळपासून मजारीचे बांधकाम पूर्ण करून घेतले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पन्हाळा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस प्रमुख बलकवडे यांनी दिली आहे. पन्हाळा पोलिसांकडून वाघबीळ, बुधवार पेठ या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. गडावर जाण्यासाठी प्रवेश दिला जात नसल्याने सातत्याने काय घडलं आहे? अशी विचारणा होत आहे. पोलिसांनी मोडतोड प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
समाजकंटकांवर कारवाईची मागणी
दरम्यान, आज झालेला प्रकार पाहता सीसीटीव्ही बसवण्याची मागणी करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणाऱ्यांना समाजकंटकांवर आणि पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पन्हाळावासियांकडून जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या