Har Har Mahadev : सुबोध भावे यांचे कोल्हापुरात शूटिंग सुरू आहे हे विसरू नये; 'हर हर महादेव' चित्रपटाच्या दिग्दर्शकांना शिवभक्तांकडून सूचक इशारा
'हर हर महादेव' या वादग्रस्त चित्रपटावरून वाद दिवसागणिक वाढत चालला आहे. हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित होत असल्याने कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावे यांची भेट सूचक इशारा दिला आहे
Har Har Mahadev : 'हर हर महादेव' या वादग्रस्त चित्रपटावरून वाद दिवसागणिक वाढत चालला आहे. हा चित्रपट आज टीव्हीवर प्रदर्शित होत असल्याने कोल्हापुरातील शिवभक्तांनी सुबोध भावे यांची भेट घेत सूचक इशारा दिला आहे. सुबोध भावे छत्रपती शिवरायांची भूमिका 'हर हर महादेव' चित्रपटात साकारत आहेत. चित्रपटाबद्दल असलेल्या आक्षेपाबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी शिवभक्तांनी सुबोध भावे यांची भेट घेऊन केली. तसेच दोन दिवसांत दिग्दर्शकांकडून या चित्रपटाबद्दल माफीनामा न आल्यास चालू शूटिंग बंद पाडू, असा इशाराही दिला.
'हर हर महादेव' चित्रपटाचे टीव्हीवर दाखवताना आक्षेपार्ह सीन वगळले नसल्यास सुबोध भावे यांचे कोल्हापुरात शूटिंग सुरू आहे हे विसरू नये, असा इशारा शिवभक्तांनी दिला. शिवभक्तांच्या भावना दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंतीही सुबोध भावे यांना करण्यात आली. यावेळी संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. या भेटीनंतर सुबोध भावे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, या चित्रपटामध्ये मी फक्त एक कलाकार म्हणून काम केलं आहे. मरेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रेम करणार आहे. इथून पुढे कोणताही बायोपिक करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक सिनेमा असेल.
ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे
दरम्यान, (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev )ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल तर तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या